तीन गझला : अमित वाघ

 



१.


काय कामाचा फणा माझा

वाकलेला जर कणा माझा


घेतले आधी विवेकाने

बघ अता वेडेपणा माझा


मी विनाकारण जगू शकतो

जीव घे तू कारणा माझा


वाचली जेव्हा बहीणा मी

माज जिरला शिक्षणा माझा


ठेवला मी बर्फ डोक्यावर

वितळला मग 'मी'पणा माझा


घेतले जाळून आईने

एक विझला पाळणा माझा



२.


मी दुःखाने इतका गदगद झालो

की दुःखाचा मुलगा मानद झालो


जेव्हा माझे मौन फुलाने खुडले

मी गुपचाप कळीचा नारद झालो


ती रागाचा सूर छेडते कायम

तरी तिच्या प्रेमात विशारद झालो


फक्त भरोसा जिवंत होता माझा

मग धोक्याने क्षणात गारद झालो


माणुसकी दुनियेला वाटत जगलो

पण मी माझ्यासाठी श्वापद झालो


३.



दोष कुठे असतो दगडाचा

गुन्हेगार तकलादू काचा


आधी माझ्या कुणीच नव्हते

नंतर माझ्या तुटला साचा


दगड मनावर ठेवत गेलो

पिरॅमीड झालो गीझाचा


हो माझ्या नात्यात लागतो

मी चंद्राचा आहे भाचा


माथ्यावर शाबूत पादुका

बस थोड्याशा झिजल्या टाचा


घातलाय गंडा दुःखाला

अश्रू ढाळुन आनंदाचा


1 comment:

  1. मस्त.. 1,2 खुपचं छान अर्थपुर्ण गझल.

    ReplyDelete