१.
जिंदगीभर वेदनेचा भार भोगाया
एक दिवसाचा इथे सत्कार भोगाया
कवडसा येतो, दिलासा तेवढ्यापुरता
जन्म हा बाकी जणू अंधार भोगाया
वंचना,अपमान,दुःखे,कोंडमारा हा
फार म्हणजे,फार म्हणजे,फार भोगाया
ही ठणक बाईपणाची सांगते आहे
पारतंत्र्या तूच तू मिळणार भोगाया
कोणता पर्याय नाही सोसण्यावाचुन
ही जखम वाट्यास हिरवीगार भोगाया
या व्यवस्थेला अता सांगून दे बाई
राहिली नाहीस तू लाचार, भोगाया
२.
जीवनाचा अंत झाला शेवटी
भेटण्या मृत्यूच आला शेवटी
प्रेयसीला अंत्यदर्शन घेउ द्या
मग मला मातीत घाला शेवटी
भाग पडले सोडणे शाळा मला
भाकरीचा प्रश्न आला शेवटी
भावनेला गर्भ नाही राहिला
शब्द वांझोटा निघाला शेवटी
धावतो प्रत्येक जण आयुष्यभर
भेटले मृगजळ कुणाला शेवटी
तो कधी येणारही नव्हता पुन्हा
पण तरी भेटीस आला शेवटी
३.
तुझी भेट घ्याया निघाली
तुला साथ द्याया निघाली
तुझ्या आठवांच्या सरींनी
शहारून काया निघाली
जरी छाटले पंख माझे
मनाने उडाया निघाली
उदासीन संसार होता
खुबीने कराया निघाली
व्यथा,वेदना झाकल्या मी
सुखाने जगाया निघाली
मला वाटली जिंदगानी
खुळी मोहमाया निघाली
स्वतः ला विसरले इथे मी
तुला आठवाया निघाली
.................................
सौ.कविता मंगेश शिरभाते -सव्वालाखे 'काव्या'
यवतमाळ
९८३४१३८००१
अप्रतिम गझला
ReplyDelete