दोन गझला : अनिसा सिकंदर

 



१.

नीती सोडुन पैशामागे पळणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे
नावे ठेवुन पाठीमागे हसणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

दिवसारात्री पालक जगतो पाल्यांचे तर जीवन उज्ज्वल करण्यासाठी
आपल्याच आई बापाला छळणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

ज्याला-त्याला नशिबाने धनदौलत,सुख,शांती मिळते जीवन जगताना
हेवेदावे,स्पर्धा,चुगली करणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

मुलगी शिकली, घर प्रेमाने सांभाळत,राबत असते संसारासाठी
मुलीस त्या वाइट नजरेने बघणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

काळ्यालाही गोरी लागे, गोऱ्यालाही गोरी मुलगी, लग्नासाठी
गोऱ्या पोरीं मागेमागे फिरणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

अविरत जो तो कष्टत असतो हिमतीने तर आयुष्याच्या वाटेवर पण
इर्षा,मत्सर,भांडण काढत जळणाऱ्या या दुनियेला मी काय म्हणावे?

२.

जागा तुझी मनी या भलतीच खास आहे
मागेपुढे तुझा तर नेमस्त भास आहे

चाहूल लागली अन् स्वप्नात  दंग झाले
कन्यारुपात आली शांती मनास आहे

ओसाड रान माझे,मोत्यांस पेरले तू
वैभव तुझ्यामुळे तर माझ्या घरास आहे

आलीस अंगणी तू दरवळ किती सुवासिक
परसात गंध सुटला,जीवन झकास आहे

घेऊन उच्च शिक्षण तू सिद्ध कर स्वत:ला
घेशील तू भरारी माझा कयास आहे

बापाविना तुझा मज आधार फार झाला
प्रेमळ सखा मिळावा इतुकीच आस आहे

उरलाय जीव माझा या पाखरांत आता
या भाबड्या मनी मी रोखून श्वास आहे

................................
अनिसा सिकंदर,
दोंड- पुणे
+919270055666

2 comments:

  1. व्वा ! अनिसाजी बहोतही बढिया! सुरेख दोन्ही गझल!..खूप खूप शुभेच्छा!..

    ReplyDelete