तीन गझला : मीनाक्षी गोरंटीवार

 



१.

इतके कर ना  देवा माझ्या मनासारखे
माझे 'मी' पण सहज गळावे दवासारखे

शुभ्र पांढऱ्या भाळालाही कधी वाटते
इंद्रधनूचे रंग मिळावे नभासारखे

दुनियेमध्ये दुसरे कुठले अमृत नाही
आईच्या मधुकुंभामधल्या दुधासारखे

गरज असावी बहुधा माझी कामासाठी
बोलत आहे गोड किती तो मधासारखे

अस्तनीतल्या त्या सापांना का भ्यावे मी
दु:खाला जर पाळत आहे सुखासारखे

गाज तुझी ही खरी असे की आभास तुझा
नदी होउनी धावत सुटते खुळ्यासारखे

माझ्याकडुनी असे घडू दे दान ईश्वरा 
कर्णालाही वाटावे जे ऋणासारखे

२.

प्रेम बेगडी होते त्यांचे,कळू लागले
जुने पसारे पुन्हा नव्याने छळू लागले

किती रोखले मनास माझ्या तरी कळेना
पुन्हा कोणत्या ओढीने ते वळू लागले

मी इच्छांना दिले उधळुनी वाऱ्यावरती
बी त्यांचे पण जागोजागी फळू लागले

या दु:खाची जात कोणती  मला कळेना
चिकटली अशी, कायम अश्रू ढळू लागले

स्वच्छ आरसा मनाचा खरा केला जेंव्हा
नजरेमधुनी माझ्या मीही पळू लागले

चालू झाली या देहाची पानगळ अशी
आकांक्षांचे पानपानही  गळू लागले

खेळ रंगला  स्वप्नामध्ये आठवणींचा
विरही मन हे कापुर होउन जळू लागले

३.

किती छंद रूंजी मनी घालतो
गझल शेर यांचा लळा लावतो

तुझ्या आठवांचा असे गंध हा
अता मोगराही नको वाटतो

तुझी याद बिलगून घेते उरी
कुठे सांग डोळा पुन्हा लागतो !

कितीदा नव्याने रुजावे पुन्हा
हवी ओल हृदयी तुला सांगतो

लळा माणसांचा असो माणसा
विठू मागणे हे तुला मागतो

समाधान वृत्ती जिथे नांदते
घरी त्या सुखाचा झरा वाहतो

अशी मोहमाया गळो आपसुक
जसा पारिजातक सहज सांडतो

1 comment: