दोन गझला : सुधीर मुळीक

 



१.


कधीपासून पत्रांना तुझे उत्तर हवे आहे 

मला माझ्याच पत्त्यावर तुझेही घर हवे आहे!


फुले शृंगारण्यासाठी दवाचे थेंब उतरावे

ऋतू शब्दांत पसरावे असे अक्षर हवे आहे 


सखे निवडुंग म्हणजे वीण नाही फक्त काट्यांची

मला तू वापरू शकते जिथे अस्तर हवे आहे 


विनाकारण सखे नव्हतो तुझ्या दारात आलो मी

तुझ्या त्या सोनचाफ्याचे मला अत्तर हवे आहे 


कधी सत्यातही लागू नये संदर्भ झोपेचा

असेही स्वप्न एखादे मला नश्वर हवे आहे 


नदी ही वाहते आहे कधीपासून एकाकी

तिलाही झाड एखादे किनाऱ्यावर हवे आहे 


नव्याने पाहिजे आहे कुणाला हात खांद्यावर?

मलाही आज पाठीवर जुने दप्तर हवे आहे !


२.


असाही आरशाइतका कुणाला ज्ञात आहे का?

जसा दिसतोय बाहेरुन तसा मी आत आहे का?


तसे तर आरशावरही चरे पडलेत थोडेसे

असेही काच म्हटल्यावर तुझ्या हातात आहे का?


तुलाही प्रश्न पडतो का कधी या कोंडमाऱ्याचा

तुझ्या देहातही कोणीतरी अज्ञात आहे का?


मला दिसतात ते रस्ते मला दिसतात ती वळणे

कळेना आजही माझ्या कुणी शोधात आहे का ?


कुणी केव्हा न मागितला घराचा वेगळा हिस्सा

असा कुठला तरी किस्सा तुझ्या बघण्यात आहे का?


मला माझ्याच भाळावर जरा ठेवायचा आहे

कधीही टेकला नाहीस तो हा हात आहे का?


मला ओलांडण्याआधी जरा पाहून घे मित्रा

तुझ्या पायातला जोडा तुझ्या पायात आहे का?


हवा आहे मला देवा नव्याने जन्म काट्याचा

बघू निवडुंग एखादा तिच्या दारात आहे का ?




1 comment:

  1. अत्यंत सुंदर गझल रचना आहेत दोन्ही! 👍

    ReplyDelete