१.
मांडू कसे जिवाचे दुखणे कुणापुढे
शब्दात वेदनेचे खुपणे कुणापुढे
हसण्यास कोणते तू कारण दिले मला
मंजूर मज न होते रडणे कुणापुढे
हा कर्णप्रश्न आता माझ्या पुढे उभा
मागावयास जावे उसणे कुणापुढे
होते कुणापुढे मज येथे सजायचे
हे चाललेय आता सजणे कुणापुढे
कळले न जर विखुरणे माझे कधी तुला
का व्यर्थ मी दळावे दळणे कुणापुढे
हा घोळ सर्व माझ्या असण्यातला इथे
माझे नकोच होते असणे कुणापुढे
ही आग जंगलाला आतात लागली
बाहेर का दिसावे जळणे कुणापुढे
२.
आतुनी गोंगाट त्याच्या फार होता
फक्त डोळ्यांनी कुठे दिसणार होता
मी मनाने गुंतलो हा दोष माझा
हाय,संबंधात ही व्यवहार होता
वेगळी तो औषधे मज देत गेला
अन् मनाला वेगळा आजार होता
नेहमी येतात कोठे शब्द कामी
वाचले डोळे तिचे, होकार होता
दूर गरजेने जरी आम्हास केले
आठवांचा केव्हढा आधार होता
हारुनी सर्वस्व अपुले जिंकलो मी
जिंकुनी ही तो किती लाचार होता
३.
उत्कटाचे बोलणे मौनातले
काय सांगावे कुणाला आतले
काढले जगणे किनाऱ्याशीच तू
शोधले ना फूल या डोळ्यातले
चौकटीने एक नक्षी काढली
आणि झाले पाखरू कोषातले
वीट येतो या सुबत्तेचा अता
केव्हढे ते दार आता मातले
आपल्यांना आपला नव्हतोच मी
त्यांनि ही मज ठेवले परक्यातले
मी कबीराचीच धरली कास अन्
सूत अवघ्या जीवनाचे कातले
फारच सुंदर!!!
ReplyDeleteव्वा. क्या बात है. तीनही गझला अप्रतिम.
ReplyDelete