१.
शाळेत काल ज्याचा,केलाय कोंडमारा
त्याच्याच लेखणीचा, विश्वामध्ये दरारा
बंदिस्त पंख होते , पाशात पाखरांचे
तोडून बंध त्याने,केला खुला पिसारा
कणभर तमा उन्हाची,आता मनात नाही
छायेत पिंपळाच्या ,त्याने दिला निवारा
भवसागरात माझी,बुडणार नाव होती
होऊन मार्ग दाता,तू दावला किनारा
धम्मामुळे मलिनता,बर्फापरी वितळली
भीमा तुझ्यामुळे हा,झाला सुधार सारा
पाणी पिण्यास नुसता,नव्हता लढा तळ्याचा
काळास अस्मितेचा, होता खरा इशारा
आयुष्यभर स्वतःच्या ,पोटास मारुनीया
चोचीमधे पिलांच्या,केला प्रदान चारा
समजू नये जराही, कमजोर लोकशाही
देशात कायद्याचा, असतो कडा पहारा
२.
समजूतदार असुनी समजून घेत नाही
माणूस माणसाच्या मदतीस येत नाही
मौनात राहण्याचा,माझा स्वभाव आहे
मुद्दाम टाळण्याचा, कुठलाच बेत नाही
आजन्म धम्मतत्त्वे , पेरू तथागतांचे
केव्हाच वेदनेचे पिकणार शेत नाही!
परक्यावरी भरवसा ठेवून योग्य केले
घरच्यांपरी दगा तो केव्हाच देत नाही!
गुत्त्यासमोर असता ,माझी बकाल वस्ती
पण मी कधीच वाहत,गेलो नशेत नाही
विश्वास माणसाचा, काचासमान आहे
तुटल्यास तो कशाने, सांधून येत नाही
३.
मी ही स्वत:स इतके,समजूतदार केले
विश्वासघातक्यांशी लढण्या तयार केले
जी माणसे हिताची,माझ्या कधीच नव्हती
त्या सर्व चेहऱ्यांना,मी हद्दपार केले
देणार साथ होते,फिरवून शब्द गेले
ठरवून आज त्यांनी,मैत्रीस ठार केले
मी मोकळ्या मनाने, सारे बहाल केले
साधा म्हणून त्यांनी, हैराण फार केले
मी शोधले तयांना, नाराज कोण होते?
भात्यातल्या तिरांनी,पाठीत वार केले
जगणे कठीण झाले, मरणे उदार झाले
निष्पाप पाखराला, जेव्हा शिकार केले
.............................................
अरुण ह.विघ्ने
मु.पो.रोहणा
त.आर्वी,जि.वर्धा
अप्रतिम गझला! 👍
ReplyDelete🙏🌹🙏
ReplyDelete