चित्रातील गझल : चित्रवाचन आणि चित्रसाक्षरता : सतीश पिंपळे



"आम्ही पंधरा वर्षांपासून 'गझलकार' सीमोल्लंघन, या नावाने दर दसऱ्याला एक ऑनलाइन अंक प्रकाशित करतो, यावेळी त्याचं मुखपृष्ठ तू करावंस, असं संपादक मंडळाने ठरवलं आहे. "
आदरणीय श्रीकृष्ण राऊत सरांचा असा सकाळी सकाळी फोन आला. श्रीकृष्णाज्ञाच ती....! ती झाल्या बरोबर अक्षरं, शब्द, ओळी, काव्य, गझल,लेख, साहित्य सारं डोळ्यासमोर यायला लागलेत, सोबतच हे साहित्य ज्यात संकलित होतं, छापल्या जातं, ज्याचं ज्ञानात रूपांतर होतं आणि ते कायम स्वरूपी राहतं असं रूप म्हणजे पुस्तक डोळ्यासमोर आलं. 



नुसतं एकच पुस्तक नाहीतर अख्खी लायब्ररीच आली. मागोमाग स्व. सुधाकर कुलकर्णी, शासकीय जिल्हा ग्रंथालय, वाचन कक्ष, संदर्भग्रंथ कक्ष इ. सर्वच आले. कॉलेजमधून घरी जाताना, किंवा चित्रकलेतील विशिष्ट संदर्भ शोधण्यासाठी,मला त्याने सर्व लायब्ररीच खुली करून दिली होती. तेथे जाऊन माझं बरंच वाचन व्हायचं. सर्वसामान्यांना जरी ग्रंथालय खुलं असलं तरी ज्यांना त्याची आवड आहे असेच लोक तेथे जातात. मी तेथे नुसतं वाचनच  करत नव्हतो तर स्केचेस देखील करीत असे. त्यातूनच तयार झालेलं, या वेळी प्रकाशित झालेलं 'रेफरन्स बुक्स' नावाचं माझं चित्र, मुखपृष्ठावर झळकतंय. त्याला स्थान दिलंत या बद्दल सर्व संपादक मंडळाचे आभार!
श्रीकृष्ण राऊत सरांशी बोलताना अतिशय समर्पक शब्दांत त्यांनी एक विचार मांडला. ते म्हणाले " पुस्तकांच्या कपाटासमोरील रिकामी खुर्ची खूप महत्त्वाची आहे. एक तर संदर्भ ग्रंथातील हवा असलेला मजकूर घेऊन तेथून कुणीतरी उठून गेलं आहे किंवा एवढं मोठं भांडार असताना अजूनही कुणी आलं नाही असे दोन अर्थ निघू शकतात. खुर्ची जर नसेल तर चित्रातील प्राणच नाहीसा होईल ! ". अशा प्रकारे जेव्हा एखाद्या चित्राविषयीची संकल्पना बघणारा रसिक करायला लागला तर खऱ्या अर्थाने चित्रकाराच्या चित्राला दिलेली दाद, ही चित्रकाराला सुखावून या साठी जाते की ते चित्र नुसतं बघितल्याच जात नाही तर त्याचे 'वाचन' होतंय असं वाटतं. चित्रकारांचे शब्द म्हणजे रंग,रेषा,पोत, छायाप्रकाश इ. होय आणि सरांनी आणखी एक छान वाक्य सांगितले ते म्हणजे
" चित्र हे चित्रकाराला सुचलेली गझलच असते ! "
तसं पाहिलं तर खरं आहे ते, कारण छोट्या-मोठ्या घटना जेव्हा संवेदनशील मनात प्रवेश करतात तेव्हा रंग, रेषा, आकारांसह विशिष्ट स्ट्रोक्स आणि शैलीतून बाहेर पडतात, म्हणजेच कॅनव्हासवर अवतरतात. म्हणून आपण त्याला 'चित्रकाव्य' किंवा 'चित्रशब्द ' म्हणू शकतो. जसं कवी किंवा लेखक जेव्हा शब्दांतून व्यक्त होतात, ते वाचल्यानंतर प्रत्येक वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर 'त्यांच-त्यांच' स्वतःचं असं चित्र उभं राहतं ; ते 'शब्दचित्र' होय. वाचन हे दोन्ही प्रकारांतून होते म्हणून 'चित्रवाचन' देखील अधिकाधिक होत रहावं, जेणे करून 'चित्रभाषा' सर्वांनाच ज्ञात होईल.


याचं प्रमाण वाढतं असावं, कारण जसं जसं 'चित्रवाचनाचा' छंद सर्व जण जोपासायला लागतील तेव्हा तेव्हा ते असं म्हणणार नाहीत, 'की चित्र हा माझा प्रांत नव्हे', सर्वच जरी चित्र निर्मिती करीत नसले तरी चित्र म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती ? कोणते चित्र कोणत्या माध्यमातून किंवा शैलीतून केलेले आहे?  रंगांना प्रतिकात्मक अर्थ असतात कां ? एखादे चित्र आवडणे किंवा नावडणे हे त्या चित्राच्या सादरीकरणावरून ठरते. ही  सर्व प्राथमिक माहिती सर्वसामान्यांना देखील असावी. तशीच ती साहित्य, काव्य, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र,आणि वास्तुकला याविषयी सुद्धा जुजबी, आवश्यक व प्राथमिक माहिती प्रत्येकाला असावी.
यातूनच खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्राविषयी आपुलकी निर्माण होऊ शकेल. प्रत्येक कलेकडे, प्रत्येक क्षेत्रातील, कलावंत व रसिकांनी जिज्ञासू वृत्तीने पाहिल्यास सहजपणे निर्मिती मागील मर्म/ गूढ, सहभावना उलगडून एकूणच कलाक्षेत्रांकडे पाहण्याची उत्सुकता वाढीस लागेल, असं मला वाटतं! 
आता तर आपल्या जवळ असे अनेक गॅझेटस् आहेत ज्याच्या माध्यमातून आपण 'आभासी' का होईना पण संपर्कात राहू शकतो, नवनवीन ज्ञान मिळवू शकतो. अशा रीतीने जेव्हा चित्रकलेविषयी जनमानसांत आपुलकी निर्माण होईल तेव्हा तो समाज 'चित्र साक्षर' झाला असं समजण्यास हरकत नसावी !

.................................
सतीश पिंपळे,अकोला
मोबाईल नंबर - 9850199323
satishakola@gmail.com

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर आणी समर्पक चित्र मुखपृष्ट साठी मिळाले आहे ,,," गजलाकार" या गजल साहित्यावर असलेल्या अंकासाठी. पिंपळे सर यांची चित्र ही संवेदनशील आणी वैचारीक पातळीवर नेहमीच वाखाणण्याजोगी असतात. तसेच हे ही एक चित्र.
    या चित्राला तुम्ही चित्र गझल म्हणू शकता.
    कारण कपाट च्या आत शेकडो पुस्तके आहेत...वैविध्यपुर्ण विषयाची त्यातील तुम्हाला कुठली वाचायची ती तुम्ही काढून तेथील त्या खुर्चीत बसुन मंत्रमुग्ध होत वाचू शकता. त्या कपाटात प्रत्येकासाठीचं काही ना काही दडलंय , माझ्यासारखा एखादा चित्रकार त्यातील पुस्तक वाचुन एखादी नविन चित्रमालीका रंगवलं. जस सभोवताली घडणार्या घटना, कादंबरी ,कविता ,गझल यातुन चित्रनिर्मितीसाठी होते तसेच चित्राचे ही आहे.
    भाषेच्या उत्पत्तीचा विचार करता सर्वप्रथम चित्र हिच भाषा होती. आदी मानवाने जी गुहेत चित्रे रेखाटली त्यावरून अनेक सन्शोधन झाली. तसेच चित्रलिपी वरुन हळूहळू भाषेचा उगम होत गेला असे म्हणायला हरकत नही अस मला वाटते. पाली लिपी असो वा अनेक ज्या भाषा तयार झाल्या त्या चित्रलिपी च्या आधारे.म्हणून चित्र आणी शब्दचीत्र (कथा,कादंबरी ,कविता, गजल ) हे सर्व एकमेकास पुरक आहेत .
    पिंपळे सर खुप खुप अभिनंदन...चित्र तर कमालच ...या अंकास खुप खुप शुभेच्छा

    चित्रकार सुनिल बांबल
    चिखली,महाराष्ट्र. मोब.9970287835

    ReplyDelete
  3. सर्वप्रथम "गझलकार - सीमोल्लंघन २०२३" या अंक निर्मितीत सहभागी सर्वांचे मनापासून धन्यवाद. एक विशेष बाब अशी की या अंकामध्ये माझे मार्गदर्शक, गुरु श्री. पिंपळे काका यांच्या चित्राचे मुखपृष्ठ आहे आणि त्यांचाच "चित्रातील गझल : चित्रवाचन आणि चित्रसाक्षरता" या विषयावरील अनुभवसिद्ध लेख देखील आहे. एकूणच मुखपृष्ठावरील चित्राने व लेखाने नकळत एक आकलन सुरु झाले. ते थोडक्यात मांडण्याचा येथे प्रयत्न.

    पंडित हृदयनाथ मंगेशकर एकदा म्हणाले होते की "ज्ञानेश्वरी, दासबोध हे झालेले ग्रंथ आहेत, केलेले नाहीत". यातील "झालेले" हा शब्द महत्वाचा आहे. तसेच हे मुखपृष्ठावरील चित्र हे "झालेले" आहे. मुद्दाम काही करण्या ऐवजी आसपासचा भवताल, घटना, वस्तू, त्यामागील प्रेरणा या कलाकाराच्या संवदेनशील मनात तरंग उमटवतात. आपल्याला जी भाषा येते त्याने आपण व्यक्त होतो. व्यक्त होताना शब्दार्थ व शब्दापलीकडील अर्थ दोन्ही पोचवता येतात. पिंपळे काकांची चित्र ही भाषा आहे. खूप मोठ्या पुस्तकाने होणार नाही ती गोष्ट एखादी कविता, गझल, एखादा शास्त्रीय संगीतातला छोटासा खयाल किंवा एक उत्तम चित्र करून जाते.

    प्रस्तुतच्या चित्रात रूढ अर्थाने आरेखन, वास्तविकता यावर काम करण्यापेक्षा ग्रंथालयातील भावलेला भाग जास्त प्रभावीपणे चित्रित करण्यावर भर दिला आहे असे वाटते. अकाउंटिंग मध्ये एक संकल्पना आहे "substance over form". म्हणजे एखाद्या गोष्टीचा (अकाउंटिंग मध्ये व्यवहाराचा) गाभा समजावून घेणे हे त्याच्या वरकरणी आयामांपेक्षा (dimensions) जास्त महत्वाचे ठरते. बरेच वेळा असे दिसते की बाह्य गोष्टींची, तंत्रांची काळजी घेण्यात इतका श्रम होतो की गाभा पोहोचविण्याचे राहूनच जाते. या चित्रात अतिशय सोपी मांडणी आहे. पुस्तकांची दोन कपाटे, मध्यभागी एक खुर्ची, आजूबाजूच्या भिंती, झरोक्यांच्या सदृश कपाटावरील दोन आडवे पट्टे. बस एवढेच. जशी ज्ञानेश्वरी मधील ओवी ही "Terse" म्हणजे अत्यंत्य कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करून जाते, तसेच हे चित्र मोठा आशय वाचकांपर्यंत पोचवते. थोडे तपशिलात जायचे झाल्यास हे चित्र पुस्तकांच्या स्वरूपात ज्ञानाचे अस्तित्व दाखवते. मध्यभागी असलेली रिकामी खुर्ची प्लास्टिक ची आहे तरी थोडी ओबड धोबड आहे. म्हणजे ती खुर्ची infrastructure चे मर्यादित महत्व अधोरेखित करते - म्हणजे "ज्ञान प्राप्ती हे मुख्य ध्येय असलेली माणसेच ग्रंथालयात यावी एवढीच सुविधा ठेवली आहे" असेच एक प्रकारे ती खुर्ची सांगते आहे. याच वेळी खुर्ची प्लास्टिकची दाखवल्याने नवतेशी ग्रंथालयाची नाळ तुटली नाहीये हे पण अधोरेखित होते. पुस्तकांच्या कपाटावरील उजाळ हा ग्रंथवाचनानंतर येणार ज्ञानाचा प्रकाश व्यक्त करतो.

    वास्तववादी चित्र वाचकाला मर्यादित अर्थ पोचवते उदा. एखाद्या घराचे आहे तसे काटेकोरपणे काढलेले चित्र हे फक्त घराचे अस्तित्व पोचवू शकेल पण त्यात तपशिलावरील भर कमी केला आणि कलाकाराच्या मनातील आशयाचे प्रतिबिंब पडले तर ते जास्त व्यापक होते. कवी ग्रेस यांच्या आशयघन कवितेसारखेच या चित्राच्या बाबतीतही हे शक्य आहे. वाचकांच्या मनोधारणेनुसार या चित्राचे सौन्दर्यपूर्ण वेगवेगळे अर्थ प्रतीत होतील. आणि मला वाटते हेच या चित्राचे यश आहे.

    चित्रवाचन आणि चित्रसाक्षरता या दोन्ही विषयावरील श्री. पिंपळे काकांचे विवेचन हे त्यांच्या या क्षेत्रातील निरंतर व मनस्वी प्रवासाचे फलित आहे. यातून असे वाटते की आजूबाजूच्या नकारार्थी घटनांचे मूळ हे काही अंशी सध्याच्या शिक्षण पद्धतीच्या रचनेत आहे. आपले मूल अर्थाजनासाठी योग्य रीतीने तयार व्हावे जसे पालकांना वाटते तसेच त्याच्या सौन्दर्य जाणीवा समृद्ध व्हाव्या असे त्यांना वाटले तर खरोखरच पुढचा समाज खूप उत्तम, अर्थपूर्ण होईल असे वाटते. त्यासाठी "कलेचा रसास्वाद कसा घ्यावा?" या विषयावर काम होणे जरूर आहे. त्यातीलच एक महत्वाचे अंग आहे चित्रवाचन व चित्रसाक्षरता. त्यावरील श्री. पिंपळे काकांचे विवेचन हे सर्वांना खूप मार्गदर्शक आहेत. मला तर वैयक्तिरित्या त्याने खूप मदत होणार आहे.

    पुनःश्च "गझलकार - सीमोल्लंघन २०२३" संबंधित सर्वांचे या वेगळ्या विषयाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद व अभिनंदन.

    निखिल केंजळे, पुणे
    nukenjale@gmail.com

    ReplyDelete