दोन गझला : मनीषा नाईक

 



१.


महापूर डोळ्यात जन्मभर तुझ्यामुळे

आयुष्य नदीकाठचे शहर तुझ्यामुळे


रचला आहेस सापळा तू मोहाचा

फार वाटते दुनिया सुंदर तुझ्यामुळे


कित्येक व्यथा गोंदवल्या भाळावरती

सौभाग्याचा मान जन्मभर तुझ्यामुळे 


चटकाही हल्ली चटका वाटत नाही

जडला आहे जीव उन्हावर तुझ्यामुळे


कशा कशाची रोज काळजी करते मी

मनात कायम चिंतेचे घर तुझ्यामुळे


गाव,नदीचा संगम,मग तू आठवतो

क्षण एखादा होतो कातर तुझ्यामुळे


बुडू दे तरू दे वा मिळू दे किनारा 

जीव ठेवला मी लाटेवर तुझ्यामुळे


ठोका चुकतो माझा ठेका चुकल्यावर

डोंबाऱ्याचा खेळ जन्मभर तुझ्यामुळे


दिवस बदलतो पण काही बदलत नाही 

जन्म एकपानी कॅलेंडर तुझ्यामुळे


२.


विचार भुंगा बनून मन पोखरतो आहे

आयुष्याचा वासा पोकळ करतो आहे


तुझ्यापुढे मी का घ्यावी माघार प्राक्तना?

अता सामना अटीतटीचा ठरतो आहे


इथे कुणाच्या उपयोगाला पडले नाही

इथे कळेना कोण मला वापरतो आहे


चिरंजीव दु:खाचे माथ्यावरती गोंदण

अश्वत्थामा माझ्यातच वावरतो आहे


केवळ एका तक्रारीवर मला म्हणाला

पायामधला जोडा का कुरकुरतो आहे?


वेगवेगळा देह मिळाला दरवेळी, पण

एकच आत्मा अखंड वारी करतो आहे

1 comment:

  1. दोन्ही रचना अत्यंत सुंदर! सुंदर आशय!

    ReplyDelete