१.
समृद्धीचा घरात वारा वाहू शकतो
माझ्यासाठी तू गाभारा होऊ शकतो
तूच जाणले तुला खऱ्या जर श्रध्देने तू
तुझ्या आत चमचमता तारा पाहू शकतो
विचारात जर बसला कायम दुःखाच्या तू
अवती भवती सदैव पारा वाढू शकतो
वागणूक जर दिली घराला समानतेची
समानतेचा नक्की नारा देऊ शकतो
नको पडू दे पदरी काही पेर रान तू
पक्ष्यांच्या तर पोटी चारा जाऊ शकतो
२.
काळजाच्या यातनांचे काय करू मी
दांभिकांच्या भाकितांचे काय करू मी
तो बळावरती धनाच्या न्याय बदलतो
जन्मभर या सोशितांचे काय करू मी
मागणी येता फुलांना फार अताशा
आश्रमाच्या आश्रितांचे काय करू मी
मी विचाराने विचारू प्रश्न कुणाला
'मीच ईश्वर ' घोषितांचे काय करू मी
धावती अश्रू पुसाया पाय सदा पण
लाख गळत्या लोचनांचे काय करू मी
३.
जरी शाबूतसा आहे कडा माझा
सगे म्हणती रिता झाला घडा माझा
जिथे वाऱ्यासही परवानगी नव्हती
पहारा लावला तेथे खडा माझा
कुणाशी फोनवर मी बोललो नाही
तरीही लावला त्यांनी छडा माझा
दिला नाही जरी होकार ओठांनी
तिने नाकारला कोठे चुडा माझा
तिच्या एका कटाक्षानेच मुसमुसला
उभा हा देह जळला धडधडा माझा
तिला मिळवायच्या स्पर्धेत नाही मी
कशाला काढता मग पोपडा माझा
कुठे चालायला अडचण मला आली
जरीही पाय आहे फेंगडा माझा
जिथे हळुवार स्पर्शाची गरज होती
तिथेही श्वास झाला रांगडा माझा
.................................
बबन धुमाळ, पुणे
मो नं 9284846393
फारच सुंदर !!!
ReplyDeleteसर्व गझल उत्तम!
ReplyDelete