१.
सौख्य ताटातले घेतले मी कुठे
दु:ख नशिबातले टाळले मी कुठे
सत्व घेऊ नको जीवना तू पुन्हा
सांग माझ्या मला शोधले मी कुठे
घेतला प्राण तू होउनी पारधी
पिंजऱ्याला तुझ्या सोडले मी कुठे
दूर जाऊ नको बोलताना मला
वेदनांना तुझ्या ऐकले मी कुठे
काय सलते मनी सांग तू एकदा
दु:ख सारे तुझे वाचले मी कुठे
२.
कुणीच नसते जगात अपुले म्हणावयाला
उघड जरा तू हळूच तेव्हा तुझ्या मनाला
बघेल जेंव्हा जमाव ओळख तुझी नव्याने
दगड जरासा निघेल तेंव्हा पुजावयाला
फुले सुगंधी मला सजवण्या किती मिळाली
नसेल गर्दीत मीच एकटी बघावयाला
गरीब असलो तरी स्वतःला सुखी म्हणावे
मिळेल तेव्हा तुझे तुला बळ जगावयाला
करून घे तू मनास बळकट,स्वत: स्वतःला
तुझी लढाई,तुलाच यावी लढावयाला
३.
आयुष्याला सुंदर म्हटले चुकले का हो
आठवणींच्या सोबत जगले चुकले का हो
विस्कटलेले जीवन माझे सावरताना
गझलेमध्ये गुंतुन पडले चुकले का हो
भळभळणाऱ्या जखमेने मी खचले नाही
लढण्यासाठी डोळे पुसले चुकले का हो
नाही उरली आशा आता सौख्याची मज
त्या दुःखाला गिळुनी बसले चुकले का हो
काय कमाई आहे माझ्या आयुष्याची
माय पित्याला आहे जपले चुकले का हो
..................................................
सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी
तिन्ही गझला मनाला स्पर्शून जातात....खूप खूप चांगल्या झालेल्या आहेत...
ReplyDeleteतिन्ही गझला मनाला स्पर्शून जातात....खूप खूप चांगल्या झालेल्या आहेत...
ReplyDelete