१.
क्षितिजावरती केले आहे मी घर तयार माझे
बघ आता मी करते आहे अंबर तयार माझे
सांग जीवना प्रश्न कोणता आज नव्याने देतो
जाणुन घे तू सदैव असते उत्तर तयार माझे
बहरत असते फुलाप्रमाणे, रडणे धोरण नाही
प्रेम होउनी दरवळणारे अत्तर तयार माझे
संधीसाठी वाट कुणाची रोज कशाला पाहू
मीच ठेवते माझ्यासाठी अवसर तयार माझे
धुंद मिठी मज हवीहवीशी तरी दुरावा थोडा
मर्यादेच्या रेषेवरती अंतर तयार माझे
प्रश्न भुकेचा अन् कष्टाचा कधीच संपत नाही
जगण्यासाठी रोज नव्याने संगर तयार माझे
शेतकऱ्याची आस जागवी पुन्हा 'रोहिणी ' इतकी
नक्षत्रांनो पुन्हा एकदा वावर तयार माझे
२.
काळिज कातळ तुझे वाटता पाषाणावर हिरवळ दिसली
पाषाणाच्या हृदयामधली नदी बिचारी अवखळ दिसली
सुकून गेला वृक्ष कडेचा म्हणून कोणी घाव घातला
घाव घालत्या कुऱ्हाडीस त्या उगाच तेथे सळसळ दिसली
जखमेवरती खपली धरली, व्रणही आता फिक्कट झाला
कशी नेमकी आईला त्या जखमेमधली भळभळ दिसली
बंगल्यातल्या श्रीमंतीचे पार्टीमध्ये दर्शन घडले
कोपऱ्यातल्या खोलीमध्ये म्हातारीची अडगळ दिसली
पॉलिश करतो बूट पोरगा तिथेच त्याचे दप्तर दिसले
शिकण्यासाठी धडपडण्याची त्या पोराची तळमळ दिसली
श्रीमंतांच्या थाटामध्ये वस्तीमध्ये आला कोणी
दारिद्र्याच्या सोयरिकीची मनात त्याच्या मळमळ दिसली
दोन्ही गझला खूप सुंदर , रोहिणी
ReplyDeleteफारच सुंदर !!!
ReplyDeleteव्वा. खूप छान आहेत दोन्ही गझला.
ReplyDelete