१.
मनाला वाटले की बोंब मारा
गरज नाही तिथेही बोंब मारा
बसावा हादरा प्रस्थापितांना
अशी सामर्थ्यशाली बोंब मारा
कुणीही ऐकली जर बोंब नाही
चला त्याहून मोठ्ठी बोंब मारा
तुम्हाला मी हळू बोला म्हणालो
जरा चुकलेच, सॉरी, बोंब मारा
पुढारी व्हा तुम्ही बोंबलभिक्यांचे
करा इतकेच 'योगी' बोंब मारा
२.
बोललो मुद्दाम होतो एकदा उद्धट वगैरे
टाकले ठरवून त्यांनी मग मला धसकट वगैरे
माकडे होतो, बरे होतो तसे एकापरीने
माणसे झालो नि कळले ही खरी झंझट वगैरे
आणता आले मला नाही कधी डोळ्यात पाणी
यामुळे दुनियेपुढे ठरलोय मी निकरट वगैरे
तू जरी जपशील मरणे का तरी चुकणार आहे?
काळ शोधत राहतो मिळते कुठे सापट वगैरे
यायचे परतून तर तू ये बघू निर्मळ मनाने
पण नको घालूस आता कोणतीही अट वगैरे
ती जिथे जातील तेथे घाण पसरवतील मित्रा
जाउ दे, असतात काही माणसे हलकट वगैरे
फक्त मेल्यानेच बहुधा स्वस्थता लाभेल 'योगी'
आणि या आत्म्यासही होइल हवापालट वगैरे
३.
पाहिले वरवर तसा गोंधळ दिसाया लागला
मग तुझ्या उद्विग्नतेचा तळ दिसाया लागला
बोलक्या ओठांतल्या मौनास ऐकू लागलो
कोरड्या नजरेतला ओघळ दिसाया लागला
फक्त मी संदर्भ बदलुन पाहिले हसणे तुझे
काळजावर उमटलेला वळ दिसाया लागला
आठवण बरसून गेली एवढी बेभान की
खोलवर हृदयामधे सादळ दिसाया लागला
हुंदके दाबून नुसती मुसमुसत ती राहिली
मग तिच्या नजरेतसुद्धा छळ दिसाया लागला
डोकवत होते तुझे प्रतिबिंब 'योगी' ज्यामधे
आज त्या डोळ्यांतही खदमळ दिसाया लागला
वाह... योगी 👌👌👌💐💐💐
ReplyDelete