तीन गझला : शंकर विटणकर

 




१.


जवळ एवढे कोण येऊन गेले

कि डोळ्यात अश्रूच ठेवून गेले


कशी ही दुधाला सवय मायवाणी

उकळले तरी साय देऊन गेले


समजले बहरली तुझी छान मैफिल

जिवाचे सखे सर्व मिरवून गेले


हसू छान जीवन जरी दो दिसांचे

जगा मंत्र हा फूल शिकवून गेले


ढगांवर बरसली विजांचीच वर्षा

चमत्कार सारेच घडवून गेले


उजळ ज्योत प्राणातुनी आपल्या तू

दिवेही इथे वाट भुलवून गेले


पुन्हा बोल आले अबोल्यातुनी त्या

जिवाला पुन्हा वेड लावून गेले


२.


एकटा- एकटा मी असा

श्रावणासारखा खूपसा


झाड - पक्षी - पशू यांतही

शोध घे आपला माणसा


ऊन करतो क्षणी सावली

थोर वृक्षा तुझा वारसा


चंद्र - सूर्यहि मला सांगती

मीहि त्यांच्या परी अल्पसा


छान तू आरशासारखी

अंतराला बनव आरसा


कर्म ते कालचे राहिले

काल जो जाहला नाहिसा


कां मना चांदण्या रातिही

तूच नाही सुखी फारसा


३.


प्रीत फुलली अंतरी सांगू कुणाला

ही फुले स्वर्गातली वाहू कुणाला


सांगता अश्रूसही आले न कांही

काळजातिल रत्न हे दावू कुणाला


पेरले वाटेत कुसुमांनीच काटे

दोष दुःखांचा अता लावू कुणाला


आरसा नाही खरा लोकांतलाही

वाटलो मी चोर,तर साधू कुणाला


गोडवा वाणीसही देतो स्वभावच

बोलला वाइट कधी राघू कुणाला


सोबती सारेच हे मजला जिवाचे

मित्र की वैरी कसा मानू कुणाला


ये अता दुःखातही सौख्यास फुलवू

तुजविना येई न ही जादू कुणाला


 

No comments:

Post a Comment