१.
पायामधले मोजे गेले
डोक्यावरचे ओझे गेले
आली माझ्या गझल जीवनी
अन् होणारे तोटे गेले
सोबत आम्ही आहोत तुझ्या
हे म्हणणारे कोठे गेले ?
एक तडाखा मला बैसला
होते - नव्हते सगळे गेले
म्हणुनी इतका खवळत होता
सागरातले गोटे गेले
पुन्हा मला त्या मार्गी पाहुन
काळाचे तर डोळे गेले
२.
सारे काही माझे होते
पण हे हात रिकामे होते
ऐन सकाळी माझ्या ओठी
मावळतीचे गाणे होते
मी जगण्याच्या मागे नव्हतो
जगणे माझ्या मागे होते
मेल्यानंतर जिवंत झालो
जगणे आधी सोपे होते
कशा कशाने माती होते
या शोधात बियाणे होते
३.
देवा तुझा अता मी सोडून नाद द्यावा
अन् हात घट्ट आता माझाच मी धरावा
ती मागते कधीची, मी सांगतो कधीचा
प्रेमा तुझा किती हा अस्वस्थसा पुरावा
शहरामधे भरुन या आहे जहर अताशा
गावात अमृताचा आता ऋतू असावा
आरोप मान्य करुनी जातो मरून कारण
असतो बराच घातक दाव्यावरील दावा
सांगू नकोस महती त्याला तरी फुलांची
जो घेत घेत जगला काट्यांमधे विसावा
No comments:
Post a Comment