१.
मानला निर्णय खरा साऱ्या जगाचा
कौल नाही घेतला तू तर मनाचा
जाहला आक्रोश स्वप्नांचा मुक्याने
स्पर्श होता कोरडा झाला कुणाचा
सावली टाळून आईने कितीदा
घेतला पदरात कोलाहल उन्हाचा
एक चिंता पोखरत आहे मनाला
देठ खुडते कोवळा माझ्या सुखाचा
मी व्यथा सांगून माझी श्रावणाला
मिसळला अश्रूत अश्रू पावसाचा
सारखे चिडणे तुझे सोडून दे तू
राहिला नाही भरोसा माणसाचा
२.
मी स्वतःवर ना भरोसा ठेवला
काढले वेड्यात आधी मी मला
एक बाजू ऐकली आहेस तू
हा तुझा उलटा निवाडा चालला
मी स्वतःच्या मोडल्या इच्छा किती
तू दिलेला शब्द नाही मोडला
का उगा म्हणतेस तू परका मला
मी तुझा तर हात नाही सोडला
वेगळी उंची तुझी माझी इथे
वेगळा दुनियेत दर्जा आपला
मी जसा आहे तसा आहे इथे
तू ठरव वाईट की मी चांगला
३.
एवढा येतो तुला जर कळवळा
सोस मग तूही उन्हाळ्याच्या झळा
दु:ख माझे मी कसे सांगू तुला
तू तरी आहेस कोठे मोकळा
लावला नाही तिला मी जीव पण
लागला आहे तिला माझा लळा
काय सांगू वेगळी माझी व्यथा
मी कुठे आहे तुझ्याहुन वेगळा
आठवण येते तिची तो क्षण नवा
तोच तर माझ्या सुखाचा सोहळा
दोष वाटेला तुझ्या देऊ कसा
मी मला केलाय इतका अडथळा
आवडीने टाकते दाणे तुला
प्रेम आहे वा कदाचित सापळा
No comments:
Post a Comment