१.
उन्हाने तप्त झालेला महासागर तुझ्यामध्ये
तरी पाऊस देणाऱ्या ढगांचे घर तुझ्यामध्ये
किती उत्साह लोकांचा किती बाजार गजबजले
दिवाळीला न पिकलेले मुके वावर तुझ्यामध्ये
डबल इंजिन ट्रिपल इंजिन असू द्या आजची सत्ता
उद्या मतदान देताना खरी पावर तुझ्यामध्ये
तुरुंगाची न ईडीची तुला नाही भिती कुठली
कमवली जी स्वकष्टाने अशी भाकर तुझ्यामध्ये
तळ्या तुज लागली हल्ली तहानेची सवय कारण
तिरावर रोज येणारी वसे घागर तुझ्यामध्ये
२.
धावता मी हारलो तर काय झाले
कालपेक्षा आज तगडे पाय झाले
भोगली पण राजसत्ता कैक वर्षे
वासरांची कोण येथे गाय झाले
दीन झाले गांजलेले रंक खचले
मातलेले राव होते राय झाले
पेटले नाही जराही दोष तुमचा
थंड रक्ताची तुम्ही का साय झाले
पाहिले मी त्या अभागी लेकरांना
आसवांचे नेत्र त्यांची माय झाले
३.
मनाच्या आड ओलावा जरा नाही
अरे दुनियेत मायेचा झरा नाही
बढाया लोककल्याणी किती फसव्या
कितीकाना घराचा आसरा नाही
कमाई कर स्वकष्टाची हिशोबाने
अती हव्यास पैशाचा बरा नाही
किती फसवेगिरी येथे उतू गेली
जमाना आजचा सारा खरा नाही
नको आई मला सोडून तू जाऊ
तुझ्याखेरीज शोभा या घरा नाही
...................................................
सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
No comments:
Post a Comment