तीन गझला : किरण पिंपळशेंडे

 



१.


किती बोलतो रोजच आपण

हवे कशाला काही कारण


तुझे बोलणे मी ऐकावे

छानच जातो दोघांचा क्षण


उगाच वाटे उंच उडावे

असे जरी हाताला काकण


टाळू नकोस मजला आता

सोबत राहू आपण साजण


तुझी आठवण सभोवताली

रोजच वाटे आहे श्रावण


रोज खेळ हे नवे जीवना

मागून कसे ना मिळे मरण


२.


मी तेच ते पुन्हा बोलायला नको

आता खुळ्यापरी वागायला नको


हातात हात घे सोडू नको असा

प्रेमात मग कमी वाटायला नको


झाल्या चुका जरी माझ्यातुझ्या किती

आपण असे कधी भांडायला नको


वेळीच घेतले मन आवरून हे

मोहात कोणत्या राहायला नको


आले निघून मी शोधीत चांदणे

आकाश सावळे भेटायला नको


हे दार आठवांचे बंद ठेवले 

ठोठावले तरी खोलायला नको


३.


लिहावे किती मीच माझ्या मनावर

जरासे लिहूदे मलाही जगावर


भरवसाच नाही जिवाचा जराही

तरी मानवा माज आहे कशावर


चरे पाडले काळजाला हजारो

अता बंधने घाल तू आठवावर


किती रान केले तिनेही जिवाचे

तुझे नाव का मग असावे घरावर


भिजावेत डोळे किती आसवांनी

कसा आळ घ्यावा तरी मी कुणावर


तिढे सोडवावे किती भावनांचे

कधी हुंदका आत होतो अनावर


खुणा सोडल्या का तिथे सावळ्याने

दिसे राधिका आजही त्या तटावर


थिटी वाटती आज सारीच नाती

किती घाव केलेस माझ्या दिलावर 


2 comments:

  1. तुझी आठवण सभोवताली

    रोजच वाटे आहे श्रावण....खासच 👏

    ReplyDelete