तीन गझला : सौ.कल्पना गवरे

 


१.

मला रिक्त आकाश सारे दिसावे
तुला का परी सर्व अंबर मिळावे?

धरेवर इथे चांदणी रोज झुरते 
अरे चांदव्या,तू नभी का फुलावे?

मला रोज छळतो तुझा तो इशारा
कसे सांग माझ्या मना सावरावे?

तुला मी पहावे दुरूनी कशाला?
तुझ्या जीवनी मी असूनी नसावे!

नशा यौवनाची अशी का चढावी?
सख्या नित्य जवळी तुला मी बघावे!

असा धुंद वारा गुलाबी सुटावा
मनाच्या कळीने जरासे खुलावे

घडी मीलनाची अशी ही घडावी
जणू या धरेवर क्षितिज हे विसावे!

करावी कशी बोळवण मी मनाची
किती कल्पनेतच तुझ्या मी रमावे!

२.

प्रत्येक जीव येथे खोट्यास मानणारा
नाही कुणी कुणावर विश्वास  ठेवणारा!

कोणी कुणास येथे ना भीक घालणारा
जो तो स्वतः स्वतःचा बघ डाव साधणारा!

चुक आपलीच असते पण मान्य कोण करतो
दुसऱ्यास दोष देतो खोटेच वागणारा!

साम्राज्य जीवनाचे केले बहाल तुजला
राजा तुझ्याविना हा ना खेळ रंगणारा!

मिथ्यात विश्व बुडते अंधार आत असतो
अतृप्त भावनांच्या आगीत जाळणारा!

जात्यातही भरडतो ताटात घास होतो
पण श्रेष्ठ मात्र ठरतो तो भूक जाणणारा!

फुलपाखरे  फुलांवर स्वच्छंद फेर धरती
पण धूर्त भ्रमर असतो मकरंद चोरणारा!

३.

माझ्याच भावनांशी माझाच खेळ सारा
मी शोध घेत जाता,माझ्यात मीच न्यारा

जात्यात भरडल्याची ना खंत हो कुणाला
दाणा दळून घेतो देण्यास घास चारा

वेडात झिंगतो जो खोलात तोच शिरतो
काठावरीच असतो पाण्यास तो भिणारा

पचवून दुःख अपुले जगतास हास्य देतो
स्मरणात नित्य राहे आनंद वाटणारा

माणूस तोच ठरतो दुनियेमधे निराळा
सर्वस्व देउनीया शब्दास जागणारा

.................................
सौ.कल्पना गवरे
शब्दांजनी
मो.8108222477

1 comment:

  1. कल्पना खूप छान तिन्हिही गझल,खूप शुभेच्छा!

    ReplyDelete