तीन गझला : डॉ.सुभाष कटकदौंड

  



१.


घडत गेलोय संस्काराने बाकी काही नाही झालो मोठा कर्तृत्वाने बाकी काही नाही 


आयुष्याच्या वाटेवरती सखीच झाली काठी 

आलो इथवर आधाराने बाकी काही नाही 


आयुष्याच्या गणिताची मज नव्हती ओळख पाळख

खूप शिकवले व्यवहाराने बाकी काही नाही 


काय करावे? कसे करावे? समजत नव्हते काही

विचार केला रिक्त मनाने बाकी काही नाही 


आठवणींचा पाऊस सखे आला माझ्या दारी

भिजलो मीही आनंदाने बाकी काही नाही


२.


खूप झाले धावणे घ्यावा विसावा म्हणतो 

सावलीचा हात मी हाती धरावा म्हणतो 


भूतकाळाचे दिले खोटे हवाले त्यांनी  

मी जुना इतिहास सारा आठवावा म्हणतो 


तू शहाणा मी शहाणा वाद का घालावा 

शब्द माझे वेळ माझा वाचवावा म्हणतो 


भोग हे नाहीत सारे मागच्या जन्मीचे 

जो मनी अंधार माझ्या पेटवावा म्हणतो 


आजवर नाही कुणी तारीफ केली माझी 

मीच तो आहे मला जो आज वा वा म्हणतो


३.


फार नाही शब्द थोडे उधार घेतले मी 

भावलेले शब्द काही दुबार घेतले मी 


संपली नाही लढाई उमेद तीच बाकी 

आग होता शांत थोडे निखार घेतले मी 


योजलेले होत गेले बऱ्याचदा मनाचे 

मोजले नाही कितीदा नकार घेतले मी 


बोलणे साधेसुधे ऐकलेच ना कुणीही 

मोजके पण शब्द मग धारदार घेतले मी 


आजही आहे सखे तो तुझाच पावसाळा 

आठवांचे फक्त थोडे तुषार घेतले मी 


.........................................

डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड खोपोली,रायगड

मो. ९५६१२८४४०८


No comments:

Post a Comment