१.
निर्गुणी आकार जपतो
मी फुलांचा वार जपतो
बंद करतो ओंजळीला
कोवळा अंधार जपतो
सांगतो प्राचीन गोष्टी
त्या वडाचा पार जपतो
तू गुन्हे केलेस लाखो
मी पुरावे चार जपतो
सौख्य दर्जेदार कारण
दुःख अब्रूदार जपतो
पांगलेल्या सावल्यांची
मी स्मृती अलवार जपतो
आतली माझ्या प्रवाही
ती विजेची तार जपतो
२.
विधवा झाली,भळभळ शिल्लक उरली
तिच्या नशीबी रौंदळ शिल्लक उरली
प्रत्येकाला डाग लागला आहे
कुठे माणसे निर्मळ शिल्लक उरली
दान देउनी निर्मोही झाल्यावर
एक रिकामी ओंजळ शिल्लक उरली
आदिम वाड्याभवती खचल्या भिंती
बघावयाला हळहळ शिल्लक उरली
अपंग झाली मनात इच्छा ज्याच्या
त्याला कुठली खळखळ शिल्लक उरली
जिर्ण जाहल्या पिंपळझाडाखाली
गर्द ही कशी हिरवळ शिल्लक उरली
विरक्तीतला ध्यास लागला म्हणजे
मोक्षालाही अडगळ शिल्लक उरली
३.
मनाच्या खिन्न लहरीवर व्यथेचा सूर अर्ध्यावर
उपाशी ओठ तगमगले कुणाचे दूर अर्ध्यावर
कुण्या प्राचीन शिल्पाचे रडाया लागले डोळे
कुणाचा खोडला होता कुणी मजकूर अर्ध्यावर
उमलत्या दोन श्वासांची कहाणी राख होताना
पुन्हा परतून आला का चितेचा धूर अर्ध्यावर
स्वतःपासून माझ्या तू स्वतःच्या दूर गेल्यावर
मला लागून असते का तुझी हुरहूर अर्ध्यावर
दिल्या व्याकूळ जेंव्हा मी नदीला सारख्या हाका
तिची खळखळ मला देते तिचे काहूर अर्ध्यावर
No comments:
Post a Comment