तीन गझला : विद्या देशमुख

 



१.


ना न्याय भेटला, ना अन्याय दूर केले

सुटणार कायद्याचे ना हात बांधलेले


बोलून काय सांगू वाचाच मौन झाली

होते किती भयंकर ते दृश्य पाहिलेले


जावे कुठे कळेना पेचात जीव मोठ्या

वाटा दुभंगलेल्या अन् दोर काटलेले


केला प्रहार ज्यांनी अब्रूवरी निरागस

मोकाट आजही ते फिरती हपापलेले


ज्या क्रूर वेदनांचा केला निषेध होता

काळानुसार त्यांचे इतिहास होत गेले


संवेदना हरवल्या शून्यात गरगरोनी

ठेवून फक्त मागे आभाळ पेटलेले


२.


कातरवेळी तुझ्या स्मृतींनी हळहळते मन

गालावरती अश्रूं होउन ओघळते मन


सोनकेवडा कस्तूरीसम तुझी आठवण

बहर सुगंधी केशर शिंपित दरवळते मन


उगाच रुसतो उगाच हसतो जगतो आपण

मलुल मनाने आसुसलेले कळवळते मन


ऊन-सावली ऋतू निराळे म्हणजे जीवन

नदी होऊन नितळ जलासम झुळझुळते मन


आठवणींच्या इंद्रधनूचे माळुन तोरण

आनंदाने श्रावणापरी हिरवळते मन


३.


संस्कारांची भरली पाभर माझी आई

आनंदाची झुलती घागर माझी आई


नवदुर्गेचा खणखण संबळ माझी आई

भक्तीचा नित निर्मळ जागर माझी आई


चुटकीसरशी अडवी वादळ माझी आई

झुंजते संकटांशी कणखर माझी आई


नील नभाचा रेशमी पदर माझी आई

मायेचे डोक्यावर छप्पर माझी आई


सोबत माझ्या सतत निरंतर माझी आई

मांगल्याची मूर्ती सुंदर माझी आई


श्रावणातली मोहक हिरवळ माझी आई

प्राजक्ताचे गंधित अत्तर माझी आई


उब मायेची असते घरभर माझी आई

गोधडीतले प्रेमळ अस्तर माझी आई

2 comments: