तीन गझला : स्मिता साळवी

 


१.


वाटतेस तू कमाल शायरी कथेतली

नायिका दिमाखदार भरजरी कथेतली


जर तुका अशक्य तर बनून दाव आवली

भूमिका तिची कळायला हरी कथेतली


स्वप्नपुर्ततेकडे प्रवास चालला तिचा

एक हिरकणी दिसे घरोघरी कथेतली


भावजय-नणंद वाद पेटतो पदोपदी

ही परंपरा उमा-असावरी कथेतली


आसरा अनोळख्यास सांग द्यायचा कसा

आठवायची तशात ओसरी कथेतली


पुस्तकामुळे निवेल भूक मस्तकातली

भूक भागवेल काय भाकरी कथेतली


तोच घेतला खयाल, चोरली कलाटणी

चालली इथे खुशाल तस्करी कथेतली


२.


तुझ्यावाचून काहीही अडत नाही म्हणाले जग

मला जिरवायची आहे जगा आता तुझी ती रग


"तुझ्यानंतर कुणासाठी जगू मी एकटा राणी"

म्हणूनच आणली आहे कदाचित ही नगाला नग

 

नदी-सागर मिलन व्हावे नसावे मान्य देवाला

सुकवले खर, झरे, नाले , पळवले दूर काळे ढग


सतत ताठा बरा नसतो शिकवते नम्र तृणपाते

उमळले वृक्ष मोठ्ठाले तिथे पातेच धरते तग


गरज नसतेच आताशा, मदतही वाटते लुडबुड

जिथे किंमत न कष्टांची तिथे नाही करत दगदग


तमाशा वाटतो मी अन् नजाकत लावणीची तू

तुझे जीवन लयीमध्ये तसा पद्यातला मी वग


स्विकारू सत्य मृत्यूचे, करू सुरुवात जगण्याची

किती बंदिस्त ठेवा पण सहज उडणार आहे खग


३.


मुद्दामच मी दुःखासंगे थोडी थोडी सलगी केली

सदा फसवते मला म्हणूनच दूर सुखाची बदली केली


पोळी, भाकर, डोसा, पिझ्झा, प्रत्येकाला वेगवेगळे

कुटुंबातले ऐक्य राखण्या एकच हिरवी चटणी केली


दळण नको रे दळू दयाळा, गोवर्धनही नकोच उचलू

"डबा आण जा चक्कीवरचा" कुठे मागणी भलती केली


मूर्तीपूजा, व्रत-वैकल्ये जमली नव्हती कधीच मजला

दाणा-पाणी दिले पाखरा, भक्ती त्यातच असली केली


वैर नकोसे वाटे कायम, उधार त्याला ठेवत गेले

किंमत ठेवत हर नात्याची, मैत्री केवळ नगदी केली


2 comments: