तीन गझला : श्रीराम गिरी

 



१.

भरोसा काय दुनियेचा इथे वेडे ठरावे मन
असे हे मोकळे कोणाजवळ सांगा करावे मन

कुणाची काळजी घे पण कुणावर प्रेम करताना
अगोदर आपले तू छानपैकी सावरावे मन

जिथे हे दूध झाले माउलीचे पारखे बाळा
कुणासाठी तिथे आता कुणाचे हंबरावे मन

कधी याचा कधी त्याचा विजय कोठे कुणाचा हा 

तरीही हारण्याला का असे हे घाबरावे मन

तुझे मी काय सांगावे मला माझ्यावरी शंका
मलाही मागते आहे अरे हल्ली पुरावे मन

कसे काबूत ठेवावे असे ह्या स्वैर वाऱ्याला
कसे चिमटीत इवलेसे इथे कोणी धरावे मन

२.

खेळते ही खेळ नाना आतली हळहळ
ठेवली आहेस मागे केवढी तळमळ

ही मुळी नाहीच आहे आपली चिंता
हे जिथे जाईल तेथे घेउनी वादळ

एक ही होतील जेव्हा आपली दुःखे
दूर हा होईल तेव्हा आपला गोंधळ

कोणत्या ओघात आपण पोचलो कोठे
पोचला कुठल्या कुठे हा आपला ओघळ

हे अधाशी चोचले इच्छा दुराचारी
ही कुठे नेणार आहे आपली चंगळ.

पाहिजे संपन्न जर भवताल मायेने
आणखी मोठी करा ही आपली ओंजळ

टोचते आहे तिलाही एकटेपण हे
जी उभी बांधावरी ह्या वेगळी बाभळ

३.

वेदनेची वाहिली मी आर नाही
ह्या सुखाचे मानले आभार नाही

बंद ही संवेदना खोलीत कोण्या
का खुले येथे मनाचे दार नाही

संकटे आहेत ही नाना तऱ्हेची
सोबतीला एकटा अंधार नाही

दुःख देवा वेदना अन् वंचना ह्या
फक्त माझा एक तू आधार नाही

पाहतो आहे तुझी ही चलबिचल मी
स्वस्त माझाही इथे होकार नाही

वाढलो आहे तुझ्या छायेत मीही
हा नवा दुनिये मला बाजार नाही

.................................
श्रीराम गिरी,बीड
८२७५७९९०१५

No comments:

Post a Comment