१.
कोणता आजार जडला मानवाला?
जन्मभर सांभाळतो बस 'मी' पणाला !
संयमाला जीवनाशी जोडल्यावर
कासवाने जिंकले आहे सशाला
मी तुझ्या-माझ्यात बघते एक मूर्ती
जात नाही कोणत्या तीर्थाटनाला
आसवांनी पापण्यांचा काठ भरता
माय म्हणते थांब ना रे, हुंदक्याला
कान भिंतीला नका लावू जराही
ऐकता येणार नाही काळजाला
नोंद कुठली ठेवली नाही कशाची
काय घेऊ काय देऊ या जगाला
राहिला नाही कुणावरही भरोसा
याचसाठी मित्र केले आरशाला
२.
पाझर तुझ्या मनाचा वाटे खरा असावा
डोळ्यात आसवांचा नक्की झरा असावा
नाहीच काळजाचे मज मागणे जराही
निर्मळ असा मनाचा या उंबरा असावा
समजून घेतले मी व्यवहार जीवनाचे
जो घाव देत असतो तो सोयरा असावा
घेऊन भाव अल्लड झोपेत हासली ती
आई तुझाच दिसला तिज चेहरा असावा
फासे जरी प्रभावी,माणूस डाव हरतो
हातातला कुणाच्या तो मोहरा असावा
रूढी परंपरा मज ओलांडता न आल्या
नक्की तुझा व्यवस्थे,हा पिंजरा असावा
३.
कोणती घेऊ फुले कोणास टाळू?
मी कशी माझ्याच ह्या इच्छेस गाळू?
आग जर नजरेत आहे श्वापदांच्या
मी कसे हृदयात हिरवे स्वप्न माळू?
जीवनाची होत आहे संथ घसरण
वाटतो मज देह हातातील वाळू
मूक बहिरे राजकारण, अंध नेते
कैफ यांचा कोणत्या ज्वाळेत जाळू?
त्या अताशा पूर्ण भरल्या खोल जखमा
तू नको ना तेच ते दुखणे उगाळू
मागणे मागावया जावे कुठे मी
राहिली ना मंदिरे आता कृपाळू
माणसाची वेदना जाणून घेण्या
भोगलेल्या यातनांचे पान चाळू
................................
प्रीती तडस, वाडीभस्मे
वर्धा
व्वा. अभिनंदन. छान गझला आहेत.
ReplyDeleteधन्यवाद काका 🙏
ReplyDelete