तीन गझला : अर्जुमनबानो शेख

 



१.


ताटात वाढलेले चतकोर चार येथे

अन् घास मागणारी तोंडे हजार येथे


पडतात चादरी अन् पुडके नभातुनी त्या

झेलावयास खाली गर्दी अपार येथे


आल्यात योजना पण गेल्या कुठे कळेना

लाटावयास वाटा जो तो तयार येथे


जाळावयास ज्याला जमली न एक काडी

नावे म्हणे तयाच्या अवघी वखार येथे


चढत्यास हीच दुनिया करते सलाम सारी

बुडत्यास मात्र मिळतो धुत्कार फार येथे 


आवेग जिंकण्याचा येतो पिलांत जेव्हा 

करते शिकार त्यांची झोकात घार येथे


थोडे जगून घेऊ जाऊ पुढे म्हणालो

केलेत बंद त्यांनी तेव्हाच दार येथे


२.


भार वाहतो गाढव कुठला

मूक चालतो गाढव कुठला


बोलघेवडे सभोवताली

मान हलवतो गाढव कुठला


राख फासुनी अंगावरती

संत म्हणवतो गाढव कुठला


हात लावले मंगळास पण

धोंडे पुजतो गाढव कुठला


झालाच हिरा कोणी जर का

त्यास खेटतो गाढव कुठला


नग्न संस्कृती पूज्य मानतो

भान हरपतो गाढव कुठला


३.


सागराच्या गोठण्यावर काय बोलू?

अन् ढगांच्या फाटण्यावर काय बोलू?


सापडेना मर्म जेथे जनहिताचे

मैफिली त्या गाजण्यावर काय बोलू?


झेप घेते ध्येयवेडी नार जेव्हा

पर तिचे ते छाटण्यावर काय बोलू?


घात झाला माणसांना माणसांचा

श्वापदांना पाळण्यावर काय बोलू?


येत नाही साक्ष कामी भावनांची

शत पुरावे मागण्यावर काय बोलू?


कष्ट करता जिर्ण लक्तर देह झाला

कळ भुकेची सोसण्यावर काय बोलू?


हद्द येथे पार होते क्रूरतेची

कायदा सुस्तावण्यावर काय बोलू?


साद त्यांनी राउळाला घातली पण

देवही मुक राहण्यावर काय बोलू?


हात झटकत दूर केले सोयऱ्यांना

एकट्याने चालण्यावर काय बोलू?


.................................

अर्जुमनबानो शेख

बल्लारपूर,जि.चंद्रपूर

मो.8055947453

No comments:

Post a Comment