१.
सोडू नकोस आशा दुःखात माणसा तू
येथे जगून जावे दणक्यात माणसा तू
संपेल दुःख सारे मिळणार सुख नव्याने
शाबूत ठेव हिम्मत मणक्यात माणसा तू
निष्पाप चेहऱ्यावर भाळू नकोस मित्रा
ओढून तख्त घेना झटक्यात माणसा तू
थोड्या पराभवाने खचतोस तू कशाला
ठेवू नकोस शस्त्रे इतक्यात माणसा तू
मोठा विचार करुनी,मोठा बनून जा तू
रमतो कशास येथे डबक्यात माणसा तू
अनमोल जन्म लाभे,थोडे जगून घेना
जाळू नको जवानी झुरक्यात माणसा तू
दिसतात खूप साधे सत्तेतले दिवाणे
घेऊ नकोस त्यांना हलक्यात माणसा तू
२.
भार साऱ्या मानवाचा देवही तो वाहतोना
या धरेचा त्या नभाचा तोलही सांभाळतोना
आज तू जे भोगशी ते, प्राक्तनाचा दोष नाही
कर्म सारे संचिताचे देह येथे भोगतोना
व्हायचे ते होत जाते, जीवनाच्या शेवटाला
जन्म-मृत्यू ,पातकाच्या काळ नोंदी ठेवतोना
दुःखितांच्या वेदनेला शांततेचा लेप देतो
आसवांचे थेंब थोडे बुद्ध माझा प्राशतोना
माय ममता-प्रेम देते श्वासही अर्पून घेते
लेकरासाठी स्वतःचे बाप जीवन जाळतोना
विसरुनी तो भूक-पाणी,काढतो मातीत सोने
संकटी हा बाप माझा या जगाला तारतोना
३.
या जगाला जीवनाचे दान मागू का?
माणसाला माणसाचे भान मागू का ?
शांततेने या धरेला तारण्यासाठी
गौतमाला पिंपळाचे पान मागू का?
विषमतेचे माजले तन कापण्यासाठी
संविधानी पुस्तकाचे वाण मागू का ?
ज्या पथावर थोर गेले जावया तेथे
पावलांना चालण्याचे त्राण मागू का?
रंजलेल्या गांजलेल्या बांधवांसाठी
निर्मिकाला मुक्त सारे रान मागू का?
माणसाच्या वेदनेला ऐकण्यासाठी
काळजाला भावनेचे कान मागू का?
No comments:
Post a Comment