तीन गझला : संजय तांबे

 



१.


सूर्यासमान जेंव्हा झळकून भीम गेला

अधिराज्य काळजाचे मिळवून भीम गेला


जगण्यास अर्थ आला नक्कीच बहुजनांच्या

घटना सुवर्णपानी बनवून भीम गेला


तो चंदनाप्रमाणे झिजला सदैव येथे 

गंधात चंदनाच्या भिजवून भीम गेला


सम्राट ज्ञान योगी ठरला खरा धुरंधर

शिरताज मस्तकावर चढवून भीम गेला


प्रज्ञा नि शील  करुणा गाथा तथागताची

अन् बुद्ध धम्म येथे रुजवून भीम गेला


ना जाळपोळ केली ना रक्तपात केला

क्रांतीस लेखणीने घडवून भीम गेला


वैरीण रात्र काळी ठरली सहा डिसेंबर

प्रत्येक मानसाला रडवून भीम गेला


२.


उतारा सातबाराचा हवा माझ्याच नावावर

दिवाणी ठोकला दावा कुटुंबाच्याच नात्यावर


सुखासाठीच जीवनभर भटकलो पार भवसागर

पुन:परतून मी आलो मुकाट्याने किनाऱ्यावर


शिशिर येऊन गेल्यावर नव्याने पालवी आली

अहा! मधुमासही सजला कळीचे फूल झाल्यावर


तिच्या एका कटाक्षाने हृदय घायाळ का व्हावे

चढवले बाण मदनाचे तिने अलगद निशाण्यावर


नकारातील कळल्यावर तिचा होकार प्रेमाचा

पुरी मोहोर उमटवली तिच्या नाजूक ओठावर


किती बर्बाद बघ केले उभे आयुष्य मदिरेने

तरीही नाचतो आहे तिच्या नसत्या इशाऱ्यावर


अता अन्याय घडणारा अघोरी रोखण्यासाठी

लढाई रोज मी लढतो कफन बांधून माथ्यावर


३.


संकटाला चिरून बघ मित्रा

उंच शिखरे चढून बघ मित्रा


झेलले खूप घाव अंगावर

खोल आता रुजून बघ मित्रा


वादळांनी जरी तुला छळले

संकटांना खुडून बघ मित्रा 


रात्र असली निबीड अंधारी

चांदण्याने सजून बघ मित्रा


जीव जडला तिचा तुझ्यावरती

प्रेम तूही करून बघ मित्रा


जन्म मृत्यू टळे न कोणाला

जीव लावत जगून बघ मित्रा


जीवनी सौख्य लाभण्यासाठी

चंदनासम झिजून बघ मित्रा


...............................................

संजय कृष्णा तांबे (साक्षीकांत)

राजापूर (निखरे), जि. रत्नागिरी

No comments:

Post a Comment