तीन गझला : रजनी निकाळजे

 



१.


मनासारखे घडले नाही

तरी कुठेही अडले नाही


प्रेमकथा मी खूप वाचल्या

प्रेम कुणावर जडले नाही 


सर्वच होते माझ्यापाशी

गर्वाने मी उडले नाही


दुःख,वेदना सोबत होत्या

हसत राहिले रडले नाही


घाव दिला तू अनेक वेळा

दुखावले तडफडले नाही


२.


ना तुझ्यावर,ना स्वतः वर,ना कुणावर

ठेवला विश्वास माझ्या पुस्तकावर


कायदा ज्याचा मला स्वातंत्र्य देतो

त्या भिमाला कोरले मी काळजावर


घेतला अंदाज होता चेहऱ्यांचा

चेहरा निरखून त्यांचा वाचल्यावर


वाटते आहे मलाही  झाड व्हावे

हिरवळीचे गाव हिरवे पाहिल्यावर


घेतले नाही मला समजून त्याने

प्रेम केले मी पुन्हा त्या कातळावर


हे जरा हटकेच होते भाव त्याचे

राग नाही द्वेष नाही मुखवट्यावर


अत्तराच्या सारखा होता सुगंधी

शब्दरजनी भाळली त्या अत्तरावर


३.


नेहमी दिसते तशी शिस्तीत असते मी

नम्रतेचे गीत अन् संगीत असते मी


एकटी असते तरी पण एकटी नसते

रोजच्या कुठल्यातरी गर्दीत असते मी


मी अशी दररोज साधी जिंदगी जगते 

सभ्यतेच्या देखण्या वस्तीत असते मी


मी हिरे  शोधून  घेते  कोळशांमधले

कोळशांच्या आतल्या खाणीत असते मी


अंतरीचा दाह कोणाला दिसत नाही

वेदनेच्या पेटत्या अग्नीत असते मी


मीच माझ्या अक्षरांची पेरणी करते

उमलत्या शब्दांतल्या शाईत असते मी


रातभर प्रेमात जळते मी दिव्यासोबत

काजळीच्या काळसर वातीत असते मी


.................................

रजनी निकाळजे

(शब्द रजनी)


2 comments: