गझल : प्रा.मोहन काळे

 



सरड्यापरी बदलला का तूच रंग आता 

विश्वास का बरे तू केलास भंग आता


संस्कार फार केले,जपले तुला फुलासम

शत्रूंसवे कसा तू केलास संग आता


माता कशी तुझी रे पाहील वाट सदनी 

वाईट माणसांतच  झालास दंग आता 


तू चूक ती करावी मी कान ते धरावे

कोठे विरून गेला कोमल तरंग आता 


मी ठेवले धरेशी पक्के जपून नाते 

विश्वास तोडला तू तुटला पतंग आता 

 

जपले कितीक सांगू इतरांकडून मजला 

का मारण्या निघाले माझेच अंग आता


श्रीमंत खूप होतो हातात फौज होती

दिधलास तूच धोका झालो भणंग आता 


खिंडीत गाठले अन् केलास वार हृदयी

मित्रा,तुझा कसा मी गाऊ अभंग आता


सोडून साथ माझी गेलेत दूर सारे

मी हारणार नाही कुठलीच जंग आता


..............................................

प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, 

अकोला

No comments:

Post a Comment