१.
नेहमी परवानगी मी घेतली आहे अगोदर
मी फुलांचा गंधसुद्धा घेतला नाही परस्पर
थांब ना जाऊ नको म्हटले जरा त्याला फिरूनी
मागतो आहे मिठी पाऊस होऊनी अगोचर
वाटते येथेच थांबावे अताशा जन्मभर मी
सत्य ना, मृगजळ जरी हे.. केवढे आहे मनोहर !
पावसाची आठवण छळते कशी मातीस इतकी
केवढी भेगाळते ती, तो फिरुन येईस तोवर
फक्त गोष्टी ऐकुनी कळते कधी दुनिया कुणाला
शाहणे होतात सारे संकटांनी घेरल्यावर
वाटले अडकेन मी भवऱ्यामधे जेव्हा भयंकर
टाळले तेव्हा तुझ्या डोळ्यातले गहिरे सरोवर
ती तशी दगडांपरी ना वागते ताठ्यात म्हणुनी
लागुनी चपलांस माती पोचते आहे घरोघर
२.
तुझे भेटणे योग असावा
विरह.. माझाच भोग असावा
का आठवते जुनेजुनेसे?
असाध्य जडला रोग असावा
गहिरे होते शेर तिचे की
दुःखांचा उपयोग असावा ?
आंदण म्हणुनी मन देते ती
स्त्रीत्वाचा विनियोग असावा
व्यक्त होऊन बघते तीही
बहुतेक नवाच प्रयोग असावा
चाफा फुलला जगास कळले
वाऱ्याचा उद्योग असावा
जखम तुला अन् त्रास मला का?
जन्मांचा सहयोग असावा
मजला त्याने त्याची म्हणणे
निव्वळ योगायोग असावा
३.
वेदनांची संपते ना रांग कोठेही
सोसण्याचा लागतो ना थांग कोठेही
गाव माझे होत आहे शहर आताशा
ना कुठे हंबर, न येते बांग कोठेही
आमची सुंदर कथा पण तो तरी म्हणतो
फक्त माझे नाव टाळुन सांग...कोठेही
सूर्य नसले मी तरीही लख्ख आहे की,
तू मला त्या कंदिलागत...टांग कोठेही
कोवळ्याशा पालवीला जन्म देताना
झाड का बघते कधी पंचांग कोठेही?
काळजी घे आठवांचे गाव फिरताना
क्षण खुळा पाजेल केव्हा भांग.. कोठेही!
वेगळेपण रंग अन् गंधातले केवळ
फूल का असते कधी दिव्यांग..कोठेही?
वाह.. क्या बात है !
ReplyDeleteसुंदर, वाह!!
ReplyDelete