१.
बोचल्यावर जिंदगीची मात असते ...
एवढे मारक जहर शब्दात असते
चालते धडपड सुखाला पाहण्याची
तेच तर खोटे शहर स्वप्नात असते
चुंबताना का सहज मिटतात डोळे
केवढी गोडी अविट ओठात असते
अंत समयी देह तर मातीत जातो
कोणती मग खुमखुमी लोकात असते
पावसाच्या दोन बाजू कोपल्यावर
काय सांगा आपल्या पदरात असते
एक दिवसाची नको ती देशभक्ती
देशभक्ती शेवटी रक्तात असते
२.
पुढची बघून मुलगी नजरेत लेक यावी
अन् भावना मनाची बापासमान व्हावी
येईल रात्र काळी तेव्हा तरी अचानक
अंधार तो सरावा ती वीज लखलखावी
येथे भले-बुरे पण कळते जनावराला
का नेमकी बिघडली ही माणसे म्हणावी
दे भान बोलण्याचे वृद्धास त्या जरासे
तू लाव ना तयांच्या देवा मुखास चावी
देवा तुझ्या मताने होईल तेवढे कर
पण शांततेत सारी जनता इथे जगावी
३.
शेत बांधाला विसरतो पावसाळा
नेमकी शहरे भिजवतो पावसाळा
वाहिली नाही नदीही आजवरती
या इथे डबके भरवतो पावसाळा
या उन्हाची काहिली पाहून आता
झाड लावाया विनवतो पावसाळा
टाळतो व्हाईत राने आमची अन्
डोंगराला त्या बिलगतो पावसाळा
जीव घेतो कास्तकाराचा बरोबर
आयत्या वेळी भटकतो पावसाळा
.................................
तुकाराम धोंडोपंत कांबळे
7758061554
वाह, अप्रतिम सर👌👌👌💐💐🌷🌷🌷❤️❤️❤️
ReplyDelete