१.
प्रश्न होते तसे खूप साधे तरी
टाळली का बरे उत्तरे तू खरी
फार होते तुझे चोचले जीवना
पेच सुटला तुझा प्राण गेल्यावरी
दुःख अल्पायुषी वाटते रोज पण..
पाहता-पाहता गाठते शंभरी
उंच कळसापरी आस नाही मनी
दे मला भेट तू विठ्ठला पायरी
नाव घेतो तुझे कोण मीरे इथे..
फक्त ध्यानीमनी सावळा श्रीहरी
कर्म समजायचे की म्हणू दुर्दशा?
एकटा बाप अन् चार वाटेकरी
नोंद घेऊ नको फक्त महिलादिनी
चौकशी कर तिची एरव्हीही घरी
२.
शोकांतिका म्हणावी की दुःख पाचवीचे
सबबी नव्या-नव्या पण आरोप नेहमीचे
घेऊन रोज फिरतो झोळीत जो उन्हाळे
असणार काय त्याला अप्रूप सावलीचे
गळतीवरी कुणीही दिसला न भाळलेला
डोळ्यात स्वप्न जपती सारेच पालवीचे
मी झाड चंदनाचे देतो सुगंध कायम
का दान मग तरीही पदरात कत्तलीचे
गझलेमुळे जरी मी आहे समोर तुमच्या
अभ्यासले अगोदर काळीज मी कवीचे
३.
इतक्यात घाबरू का मी या पराभवाला
आहे करायचे जर चितपट उभ्या जगाला
होतो तसाच आहे मी आजही मनाने
बदलून मात्र गेला श्रावण क्षणाक्षणाला
वृद्धाश्रमात शेवट झाला तिचा नि त्याचा
अस्वस्थ फार करते हे दृश्य काळजाला
जगतोय रोज जो-तो अपुल्या मनाप्रमाणे
येईल का अशाने घरपण कधी घराला
करता कशास आता साहेब पंचनामा
गेलाय बाप माझा भेटायला ढगाला
जर तू सुखात आहे मोडून स्वप्न माझे
करतोय काय राणी 'सागर ' तुझ्या उशाला
.................................
सागरराजे निंबाळकर, कल्याण
८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment