१.
उशीर झाल्यावरती आता देवा भजेन म्हणतो,
उपाय सारे करून थकलो वारी करेन म्हणतो
भविष्यातल्या पुंजीसाठी वर्षे सरून गेली,
जगावयाचे राहुन गेले आता जगेन म्हणतो
आई-बाबा होते जवळी किंमत नाही कळली,
हार घातला भिंतीवरचा फोटो स्मरेन म्हणतो
ताकद असते मौनामध्ये नकोच बडबड भारी,
शब्द मोजके मुद्द्यावरती तितके वदेन म्हणतो
स्वप्ने होती सुंदर विणली झिरमिर विरली सारी,
पण कष्टाची चादर आता पक्की शिवेन म्हणतो
क्षणभंगुर हे जीवन आहे उगाच रडलो कुढलो,
निसटुन गेले जीवन सारे आता हसेन म्हणतो
खूप खेळलो शब्दांशी अन् फिरलो वृत्तांमधुनी,
अता कुठेशी अंकुर फुटला कविता शिकेन म्हणतो
२.
स्वानुभवांनी शिकवत गेलो
आयुष्याला घडवत गेलो
अनंत होते प्रश्न तरीही
संकटांस मी झुकवत गेलो
विसकटले मोडले कितीदा
काडी काडी सजवत गेलो
अंधाराची पाटी कोरी
जीवन अक्षर गिरवत गेलो
जीवनमार्गी तण शत्रूंचे
बिनदिक्कत मी तुडवत गेलो
जरिही त्यांनी दार लावले
शिकता शिकता मढवत गेलो
ओसंडूनी वहात होतो
दु:ख मनाचे दडवत गेलो
मानमरातब खूप मिळाला
अपमानाला पचवत गेलो
हार मानली कधी न कोठे
'विजय'पथावर मिरवत गेलो
दहा दिशांनी मावळताना
पुन्हा नव्याने उगवत गेलो
.................................
विजो (विजय जोशी)
डोंबिवली
९८९२७५२२४२
दोन्ही गझल सुंदर
ReplyDeleteदोन्ही गझल मस्त.
ReplyDeleteदोन्ही सुंदर 👌
ReplyDeleteवाह👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteपहिली गझल उपरती झाल्याची आणि दुसरी स्वतःमधल्या जिद्दीची
ReplyDelete