तीन गझला : रमेश सरकाटे

 



१.

जिथे इज्जत असे तेथे खुशीने जात असतो मी
निळा झेंडा उभाराया पुरा जोशात असतो मी

म्हणालो चोर चोरांना जयानी लूटले आम्हा
कुठे चुकले मला सांगा जरी रागात असतो मी

फसे चक्रात आताशी विरोधी बोलणारा,पण
भिणारा मी नसे त्यांना जरी लाखात असतो मी

सदा जयभीम बोलाया मला अभिमान भीमाचा
असे अवलाद भीमाची, किती गर्वात असतो मी

मला ना स्वार्थ पैशाचा मला ना हाव सत्तेची
निळाईच्या भल्यासाठी निळ्या गोटात असतो मी

उन्हाळे पावसाळे पण  किती मी सोसल्यावरही
हमेशा गीत भीमाचे मनाशी गात असतो मी

किती आधार आम्हाला जगाया संविधानाचा
अताशी झोपडीमध्ये किती थाटात असतो मी

२.

भावकीतले नाते,बंधन खुशी खुशीने पाळू आता
सोडून सर्व वैर मागचे,मने तरी सांभाळू आता

मनास शांती मिळण्यासाठी हिंसा सारी सोडुन देऊ
आंतकवादी असणाऱ्यांशी नाते आपण टाळू आता

राग,लोभ,मद,मत्सर आणिक  हेवेदावे
हवे कशाला
दोष कुणाला देण्यापेक्षा मन अपुले पडताळू आता

अबलावरती अन्याय इथे रोज रोजला होतच असतो
शिक्षा देण्या गुंडांना पण सर्व चला चवताळू आता

मते मागण्या येता जाता दारू पैसे वाटप करती
आमिष त्यांचे खोटे खोटे धूर्तपणे फेटाळू आता

खडकावरच्या फुलास कोठे जीवन-ग्वाही माहित असते
पाण्याचा हा असे बुडबुडा सारे किल्मिष जाळू आता

फसून जाती चकव्यासंगे दगाबाज ह्या दुनियेमध्ये
विचार सारे कपटी इथले मनातून गुंडाळू आता

धम्माची ती शिकवण सारी मनात अपुल्या पूज्य मानुया
पूर्वीची ती विकृत फसवी संस्कृती पण जाळू आता

३.

तुझी औकात आहे तर जगाला पण कळू दे ना
कुणाला मूग छातीवर निराशेने दळू दे ना

कपाळी भाग्य लिहिले ना असे रेषेत हाताच्या
बघ्यांना जोरका झटका विचाराने  हळू दे ना

किती अन्याय होतो बघ इथे तर द्रौपदीवरती
कुठे आक्रोश बघताना मनाला सळसळू दे ना

नको घाई करू इतुकी तुझ्या एका नकाराची
घरावरचे दुखी वादळ जरा माझे टळू दे ना

किती रे पाळतो खोट्या नकोशा अंधश्रद्धा तू
मनाच्या ह्या विकारांना विपश्यनेने जळू दे ना

दिलासा संविधानाने दिले आम्हा जरी आहे
असे जे हक्क सरकारी घरी माझ्या वळू दे ना

घराबाहेर आईला नको काढू कधी भाऊ
तिचे उपकार थोडे पण तुझ्यावरचे ढळू दे ना

.................................
रमेश निनाजी सरकाटे
602, A विंग
सनराईज हाउसिंग सोसायटी
ECP वास्तू, हांडेवाडी रोड,
हडपसर,पुणे
Pin: 410028

No comments:

Post a Comment