१.
भरल्या घनाप्रमाणे,ये श्रावणाप्रमाणे
काळीज कर सुगंधी तू पावसाप्रमाणे
करतो पुन्हा चुकाही करतो पुन्हा गुन्हेही
तो प्रायश्चित्त घेतो निर्ढावल्याप्रमाणे
जर चारले जरासे मी कारले हिताचे
तर टाळतो मला तो माझ्या सुखाप्रमाणे
संसार बांधताना माणूस सांधताना
दुःखास नांदवावे सख्ख्या मुलाप्रमाणे
रात्री तरूण झाल्या कविता वयात आल्या
कोजागरी मनाची प्यावी दुधाप्रमाणे
वाचेल तोच येथे वाचेल फक्त आता
आस्वाद घे स्वतःचा तू पुस्तकाप्रमाणे
तू प्रेमपत्र लिहिले की मृत्युपत्र लिहिले?
स्थितप्रज्ञ मात्र आहे मी कागदाप्रमाणे
थेंबामधेच सागर, बीजामधेच जंगल
अन् काळजात माझ्या तू ईश्वराप्रमाणे
मेंदूमधे अमानुष जन्मास युद्ध येता
मन शांतिदूत व्हावे बुद्धा, तुझ्याप्रमाणे
२.
तोल गेल्यावर कळाले की खऱ्या होत्या
आज नात्यांच्यामधे इतक्या दऱ्या होत्या
दुश्मनालाही उपाशी मारले नाही
एवढ्या दिलदार अमुच्या भाकऱ्या होत्या
स्पर्श झाल्यागत शहारा जन्मला होता
चक्क ओळी चुंबनाहुन लाजऱ्या होत्या
काळ होता विठ्ठलाच्या शुद्ध भक्तीचा
भजन गाणाऱ्या जनीच्या गोवऱ्या होत्या
याचसाठी नमन केले तुडवण्याआधी
संकटांच्या बनवल्या मी पायऱ्या होत्या
३.
कशाने लेकरू इच्छे तुझे चेकाळले इतके?
मनाचे पालथे जावळ कुणी कुरवाळले इतके?
सुखाच्या सोबतीलाही कुणी कंटाळले इतके
मनाचा मोगरा व्हावा कुणी गंधाळले इतके
तुझ्या निष्पाप डोळ्यांनी असे सांभाळले इतके
जसे स्पर्शाविना कोणी मला कवटाळले इतके
मनाचा आरसा व्हावा कुणी पडताळले इतके
तुझे निष्कर्ष अन् माफी कसे ओशाळले इतके
फुलांच्या बासऱ्या केल्या स्वरांना टाळले इतके
सुगंधाचेच गुणगुणणे मनावर माळले इतके
दिला अंधार जन्माचा कुणी हेटाळले इतके
अशा या स्वागताने मी जगी तेजाळले इतके
कितीदा बंद डोळ्यांनी तुला न्याहाळले इतके
समाधीला स्वत:च्या मी जणू ओवाळले इतके
युगे आली युगे गेली ऋतू रेंगाळले इतके
कसे वैराग्य रखमेच्या विठूवर भाळले इतके
वाह!!! तिन्ही गझला अप्रतिम, वाह, क्या बात है
ReplyDeleteतू प्रेमपत्र लिहिले की मृत्युपत्र लिहिले?
ReplyDeleteस्थितप्रज्ञ मात्र आहे मी कागदाप्रमाणे... व्वा. क्या बात है.
Are व्वा खुप छान tai 🌹
ReplyDeleteकमाल गझला झाल्या आहेत मॅम.अप्रतिम.हृदयस्पर्शी भावनांचे संमोहक प्रदर्शन.लाजवाब!
ReplyDeleteवाहवा! तिन्ही गझल अप्रतिम!👌👌👌
ReplyDelete