तीन गझला : डॉ.संगीता म्हसकर

 


१.


वाऱ्यावरती उडून गेले

फूल गुलाबी सुकून गेले


गुन्हा असावा लाटेचा हा

नाव आपले पुसून गेले


चकवा झाला आयुष्याचा

रस्ते सगळे चुकून गेले


गर्दीमध्ये आधाराचे

बोट नेमके सुटून गेले


कुणी लावला सूर विवादी ?

रंग अचानक उठून गेले


नात्यांचा हा पाचोळा बघ

झाड फुलांचे  तुटून गेले


२.


एकटीच मी सवयीने मग चालत गेले

अंतर जेव्हा दोघांमधले वाढत गेले


साधे,सोपे प्रश्न दिलेले आयुष्याला

मनासारखे उत्तर देणे  टाळत गेले


काळासोबत बदलत गेले सारे काही

आठवणींचे दीप तेवढे लागत गेले

 

ठेवणीतले शब्द गुलाबी जरा घेतले 

किती वेळ मग तुझी वाट मी पाहत गेले


अभंग गावा वाटत होते केव्हापासुन

वारकऱ्यांचे टाळ कुठुनसे वाजत गेले


किती वादळे आली त्यांची गणती नाही

भोवऱ्यास मी जणू किनारा मानत गेले


आयुष्याची सोबत झाली काही स्वप्ने

त्यांच्या साठी रात्र रात्र मग जागत गेले


३.


उडून गेल्या पाऱ्याबद्दल काय लिहावे?

गूढ आपल्या नात्याबद्दल काय लिहावे?


काय हवे ते माग म्हणाला आयुष्याला

तुटलेल्या या ताऱ्याबद्दल काय लिहावे?


दिशाहीन हा वाहत असतो इकडे तिकडे

मनातल्या या वाऱ्याबद्दल काय लिहावे?


रंग फुलांच्या रस्त्यावरचे मोहक होते

पायामधल्या काट्याबद्दल काय लिहावे?


मैफल सरता सरता देते हाक मागुनी

ओठांवरल्या गाण्याबद्दल काय लिहावे


तुझी आठवण नसेल येथे वाटत होते

डोळ्यांमधल्या पाण्याबद्दल काय लिहावे?


No comments:

Post a Comment