१.
वेधून अंबराला जिंकून घे धरा तू
तूर्तास माणसाला समजून घे जरा तू
तू घाबरू नको रे बदलेल ते दिशाही
आत्ताच वादळाला उमजून घे खरा तू
समजू नकोस तू की अपुलेच दु:ख मोठे
हलकेच आसवांचा लपवून घे झरा तू
ज्याची अगाध लीला ज्याचा अगाध महिमा
त्याच्यासमोर थोडे जोडून घे करा तू
सारून टाक आता अंधार हा मनीचा
आला असे 'दिवाकर' उजळून घे घरा तू
२.
कसे मी मोकळे व्हावे ? असे होऊन जाते बघ
किती अन् काय सांगावे? असे होऊन जाते बघ
कधी भावूक होऊनी, जगाला सांगतो तेंव्हा,
जिवाचे घोर वाढावे, असे होऊन जाते बघ
कसा विश्वास ठेवावा ? अता अपुल्याच लोकांवर
गुपित त्यांनीच फोडावे, असे होऊन जाते बघ
नियम ना पाळती कोणी, इथे सगळेच मनमौजी
कुणाला काय बोलावे ? असे होऊन जाते बघ
कसे मी आज हे सांगू? तिची तर यादही छळते
कधी जाऊन भेटावे, असे होऊन जाते बघ
३.
अजून थोडेफार कळू दे
आयुष्याचे सार कळू दे
समोर यावे सत्य एकदा
कोण किती लाचार कळू दे
करीत होते धंदे काळे
किती घोर अंधार कळू दे
बेसावध मी असता त्यांचे,
कसे जाहले वार कळू दे
प्रेम जिव्हाळा शब्द शिकवले
कुठे हरवला यार कळू दे
.................................
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
9723717046
No comments:
Post a Comment