१.
गरजा जितक्या तेवढीच जर आवक असती
दुनिया सारी सुखी,कामसू , लायक असती
कधी मनाला राग लोभही शिवला नसता
समाज,वस्ती मानवतेची साधक असती
ज्याने-त्याने मार्ग स्वतःचा धरला असता
प्रत्येकाची इच्छा स्वप्ने माफक असती
भ्रष्ट मनांची जमात नसती जगात साऱ्या
रुढी पाशवी नसत्या, मूल्ये तारक असती
हृदयांमध्ये भिनली असती प्रेमभावना
मनामनांची नातीही सुखदायक असती
२.
तुम्हीच ठरवा अता नेमके कुठे जायचे
परत फिरू की रणमैदानी तोफ व्हायचे
खूप निराळी नाती होती तेव्हा अमुची
मने सांधली, हातामध्ये हात राह्यचे
उंच नभाशी भिडणारे पाखरू पाह्यचो
मला छाटल्या पंखांचे ते स्मरण द्यायचे
अतातरी सुटलाच पाहिजे पेच नेमका
भार कुणाचे, अजून कुठवर कोण वाह्यचे
प्रत्येकाचा अंतिम समयी प्रश्न हाच की
पसाऱ्यातले काय द्यायचे? काय न्यायचे?
३.
पाहिजे तुला तसे घडेलही कधीतरी
रंग हा तुझा जगी चढेलही कधीतरी
हे करू नि ते करू? कुठे नि नेमके कसे?
द्वंद्व हे मनातले शमेलही कधीतरी
जात,धर्म,आंधळे विचार संपल्यावरी
शांतता जगी पुन्हा हसेलही कधीतरी
ठेवली अशीच आग पेटती उरात जर
वर्ज्य या जगातले जळेलही कधीतरी
मार्ग तू तुझा नवा खुशाल चाल एकटा
सत्य या युगातले कळेलही कधीतरी
..........................................
दिलीप सीताराम पाटील,
मु. राजुरा, जि. चंद्रपूर
8390893961
No comments:
Post a Comment