तीन गझला : विजयालक्ष्मी वानखेडे

 


१.


ते कोणते रसायन लाव्ह्यापरी उसळले 

आयुष्य मीच माझे वाऱ्यावरी उधळले.


नाही कधीच केली पर्वा जरी जगाची 

माझेच घाव ओले वैऱ्यापरी चिघळले


मी सूर्यपुत्र होतो,देऊ कसा दगा मी?

रथचक्र ऐनवेळी धोक्यात का निखळले.


हा चंद्र पाहिला रे माझ्या मिठीत त्यांनी

रागातमात सारे हे चांदणे वितळले.


हे रक्त लाल होते माझे,तुझे नि त्याचे

भगवे,निळे नि हिरवे रक्तात तू मिसळले.


झालास सूर्य बाबा अंधार जाळणारा

मी अत्त दीप झालो लाखो दिवे उजळले.


२.


सुखाचे पहारे,तुझ्या भोवताली

तरी वेदनांशी,तुझी भेट झाली.


इथे वासनांची लढाई सरेना

जरी ठाव आहे मला आम्रपाली.


मला आस नाही तुझ्या उत्तराची

तुझ्या दारचा मी अनोखा सवाली.


तुला झगमगीचा नको मोह वेड्या

कधी काजव्यांनी उजळल्या मशाली?


जरा वाच ना तू असे मौन माझे

कशाला हवी अक्षरांची दलाली?


अता गौतमा तू नको धम्म सांगू

दिले राहुलासी तुझ्या मी हवाली.       


३.

वृत्त : विजयालक्ष्मी

गागालगा गागागा लगा

.

अफवेस फुटल्या वाटा किती

प्रेमा तुझा बोभाटा किती!


हाती कुठे येतो चंद्रमा

बेभान झाल्या लाटा किती?


चुकती,गवसती अन् चकवती

वाटा किती?वहिवाटा किती!


काळीज जर तू त्याला दिले

का मोजते मग घाटा किती?


गोंधळ किती हा विकऐंडला

बाकी घरी सन्नाटा किती !


1 comment:

  1. व्वा. तीनही गझला आवडल्यात. अभिनंदन.

    ReplyDelete