तीन गझला : संजय गोरडे

 



१.

फुलू दे रंग प्रीतीचा पुन्हा हृदयात एखादा
खुलू दे आज मेंदीने तुझा तळहात एखादा

नको पाहूनही ना पाहिल्यावानी करू सखये
पुन्हा भेटेनही कोणी तुला रस्त्यात एखादा

पुन्हा उमलायचे आहे; कुणाचे व्हायचे आहे,
पुन्हा कोणीतरी येईल आयुष्यात एखादा

कसे विसरू न शकलो सांग आपण एकमेकांना?
कुठे संदर्भही उरला तुझ्यामाझ्यात एखादा?

मला तर नेहमी छळते तुझे चाफेकळी हसणे
तुलाही सांग छळतो का कुणी स्वप्नात एखादा?

कुठेही जा परंतू एवढे लक्षात राहू दे
तुझा कोणीतरी आहे तुझ्या पश्चात एखादा

मला माहीत आहे की तसा मरणार नाही मी
तुझ्याशी व्हायचा आहे पुन्हा अपघात एखादा!

२.

तुझ्यानंतर कुणासाठीच मी रडणार नाही
कशासाठीच आता प्रश्नही करणार नाही

पुन्हा गेलीस तू थांबायला सांगून मागे
जरी मी थांबलो, येणे तुला जमणार नाही

तसे तर हे तुलाही चांगले माहीत आहे
निघाल्यावर पुन्हा मागेच मी बघणार नाही

जगासाठीच होता फक्त दोघांचा अबोला
अता कोणीच कोणाशी लढू शकणार नाही

कुणावरती तरी रागावलो आहे कधीचा
कुणावर नेमका कोणासही कळणार नाही!

तुझी ओली जखम सांभाळणे आले नशीबी
कसे सांगू कधीही घाव हा भरणार नाही!

तुझ्या माझ्यातले सारे कसे विसरून जाऊ?
कसे देऊ वचन जे पूर्ण मी करणार नाही!

विसरल्यासारखे कर, जर पुन्हा झाल्याच भेटी
तुला अगदीच मी सारे विसर म्हणणार नाही

३.

का तुझ्या दारी उभा? माहीत नाही
कोण मी आहे तुझा? माहीत नाही

काय आहे आपल्या दोघांत नाते
कोणता आहे लळा? माहीत नाही

कोण परका हे कसे ठरवायचे मी?
कोण आहे आपला? माहीत नाही

मी जरी प्रकरण तुझ्या जीवनकथेचे
पण मला सारी कथा माहीत नाही

फक्त झालेली सजा भोगीत आहे
काय मी केला गुन्हा? माहीत नाही

अन् तसेही जे मला माहीत आहे
ते तुला सांगू कसा? माहीत नाही

काय सांगू मी तुला जेथे मलाही
चेहरा माझा खरा माहीत नाही

.................................
संजय गोरडे 'सौभद्र'
मोबा. 7276091011

1 comment: