१.
तुझ्या सोबतीला तुझे दोन डोळे
तिच्या काळजीला तुझे दोन डोळे
जरी आंधळा मी तरी दुःख नाही
नको सोबतीला तुझे दोन डोळे
कुण्या कारणाने किनारी उभा तू
दिसावे नदीला तुझे दोन डोळे
तुझा आरसा ना कधी पाहिला मी
नको सावलीला तुझे दोन डोळे
नव्या पाखरांनी नवा मेळ केला
जुन्या गोफणीला तुझे दोन डोळे
२.
खरे मला जगण्याचे कारण पाऊस आणि तू
म्हणून म्हणतो माझा श्रावण पाऊस आणि तू
का बदलत नाही माझे म्हणणे वेळोवेळी
जपून आहे माझे मीपण, पाऊस आणि तू
ती भेट आपली कायम विसरू शकलो नाही
हीच खरेतर माझी अडचण पाऊस आणि तू
तुमच्यासाठी रोज कितीदा व्याकुळ झालेलो
मिटवुन घ्या ना तुमचे भांडण पाऊस आणि तू
मीच कुणाच्या वेशीवरती थबकत नाही जर
कसे भेदता माझे रिंगण पाऊस आणि तू
३.
वाटताना सुवास वाऱ्याने
भोगले खूप त्रास वाऱ्याने
बघ ढगातून सांडले मोती
मारली का टिकास वाऱ्याने
फक्त मिनिटात जिंकते स्पर्धा
मात द्यावी जगास वाऱ्याने
मित्र समजून ऐकली दु:खे
घात केला उदास वाऱ्याने
गर्व नक्कीच आणतो खाली
फार केली मिजास वाऱ्याने
.................................
गौतम राऊत
ब्रम्हपुरी , चंद्रपूर
No comments:
Post a Comment