१.
हा फुटू लागला फार पाझर मला
मी मिठासारखा,रोज वापर मला
चूक झालीच हातून माझ्या कधी
तूच आवर मला,तूच सावर मला
ऊब हृदयात कायम तुझ्या राहण्या
द्वेष अंथर तुझे,प्रेम पांघर मला
पाहिजे जो तुला,तोच आकार दे!
समज पाषाण मज,छान कातर मला
प्रेम कैसे करू मी तुझ्यावर अता
मागते पोट हे रोज भाकर मला
मस्त उध्वस्त व्हावे अता वाटते
सौख्य माझेच झाले,अनावर मला
राग आला कशाचा, मला सांग तू?
वृत्त थोडे कळू दे सविस्तर मला
स्पर्श होताच वितळून जाईल मी
एक हळुवार तू घाल फुंकर मला
२.
मी यंत्र नाही,चुकू शकतो
माणूस आहे,थकू शकतो
हा देश माझा,जरा हटके
कोणी कुठेही,थुकू शकतो
तू शोध दुखत्या नसा केवळ
व्यक्ती कसाही झुकू शकतो
लक्षात डोळा जरी माझ्या
मी नेम धरला हुकू शकतो
जो जो दिवाना तुझा आहे
प्रेमास तुझिया मुकू शकतो
त्यालाच जमते कला त्याची
कुत्र्याप्रमाणे भुकू शकतो
.................................
ओमप्रकाश ढोरे
स्वेदबिंदू
शिक्षक काॕलनी
चांदूर बाजार
जि.अमरावती
४४४७०४
No comments:
Post a Comment