१.
चालताना पायही रक्ताळले होते
ध्येय माझे मी तरीही गाठले होते
मी ठिगळ लावू कितीदा छप्पराला या
जर इथे आभाळ सगळे फाटले होते
भेटल्यावर पायही निघणार नव्हता ना
त्याचसाठी भेटणे मी टाळले होते
मी कधीची वाट येथे चालते आहे
माहिती नाही किती मी चालले होते
एवढे मतभेद झाले लेकरांचे की
वेगळे आईस त्यांनी टाकले होते
२.
तुला कळलेच नाही पण दुरावा वाढतो आहे
अबोला आपल्यामधला मनाला जाळतो आहे
पुन्हा घुसमट पुन्हा हळहळ नकोशी वाटते आहे
तुला संपर्क करणे मी अताशा टाळतो आहे
असावे सावलीलाही उन्हाचे भय इथे आता
जरा सांभाळ म्हणते ती उन्हाळा तापतो आहे
कुणी पाणी कुणी जीवन तुला म्हणतो जरी येथे
मला व्याकूळ तृष्णेचा दिलासा वाटतो आहे
कुणी घ्यावी दखल इतके जरी कर्तृत्व नाही पण
खरे अस्तित्व माझे मी जगाला सांगतो आहे
३.
नात्यामधला तणाव जेव्हा वाढत जातो
स्पर्श कोरडा मला तुझा मग वाटत जातो
नकोस बोलू म्हणालास तू जेव्हा जेव्हा
श्रावणातही मला उन्हाळा भासत जातो
नकोच चर्चा पुन्हा बोचऱ्या त्याच क्षणांची
आठवणींचा जुना पसारा साठत जातो
जेव्हा येते समोर माझ्या तुझीच प्रतिमा
बहर वसंती मनात माझ्या बहरत जातो
जेव्हा काही हातामध्ये शिल्लक नसते
स्वप्नांचे मी केवळ इमले बांधत जातो
................................
सौ.गौरी ए.शिरसाट
विक्रोळी, मुंबई
No comments:
Post a Comment