तीन गझल : अपर्णा नैताम

 



१.


अंगावरी शहारे, हृदयास हेलकावे.

सारेच श्वास माझे केले तुझ्याच नावे


वाईट काय होते समजून घेतले तर

आरोप संशयाचे घेती मनास चावे


कोणास दुःख सांगू शोधात मीच आहे

माझाच घात मीही, केला मला न ठावे


मी पाहतेच डोळे घारे तुझे कशाला

वाटे सदा मनाला हरवून आत जावे


वळणे जुनीपुराणी देतात हाक मजला

आभाळ आठवांचे 

पापण-मिठीत यावे


हृदयास घात होतो हा नेहमी जरीही

समजून कोण घेतो प्रेमात बारकावे


काढू नको कधीही डोळ्यांमधून पाणी

आहेत लोक येथे गावात आगलावे!


माणूस म्हणून आलो आहोत जर ग्रहावर 

माझे तुझे नि त्याचे विसरून भेद जावे

   

२.


मोहमाया आज येथे त्यागली मी पांडुरंगा

अन् सुखाची पंढरी बघ गाठली मी पांडुरंगा


कोण पुजतो सांग वेड्या या युगीही ईश्वराला

पण तुला रे भावभक्ती वाटली मी पांडुरंगा


संयमाचा बांध जेव्हा सोडला ह्या काळजाने

चिंब ओल्या पापणीने दाटली मी पांडुरंगा


पापण्यांचे ताट आहे आसवांचा दीप आहे

भाव भक्तीनेच येथे 

आटली मी पांडुरंगा


वैर आता राहिले ना कोणत्याही माणसांशी

प्रेम,मायेने जगाला 

भेटली मी पांडुरंगा


३.


ओठांत माणसांच्या अंगार पाहिला मी 

मौनात बोलणारा संसार पाहिला मी..


का लोभ होत आहे  काळीज चोरण्याचा 

मर्जीत पामराच्या निर्धार पाहिला मी 


दोघांत भावनांची गोडी कशी कळेना

कैफात पेटणारा एल्गार पाहिला मी


मी  मानले जिवाचे माझ्याच यार ज्यांना

झोळीमध्ये तयांच्या अंधार पाहिला मी


लोकांतही दिखावे असती कितीक खोटे 

जाहीर दांभिकाचा सत्कार पाहिला मी 


मूर्ती  पुजायची ही श्रद्धा खुळ्या मनाची

मनमंदिरी विठूचा आकार पाहिला मी

1 comment: