तीन गझला : नंदकिशोर ठोंबरे

 



१.


इंद्रधनुष्याइतकी सुंदर दिसते आई

जगात नसता आठवांत मग उरते आई


दमून येता,घरात माझी नजर शोधते...

भिंतीवरच्या फोटोमधुनी हसते आई


जेवलास का? प्रश्न कधी जर कानी पडला?

डोळ्यांमधुनी झरझर माझ्या झरते आई


स्वर्ग सुखाचा कसा वेगळा असेल सांगा?

काडी काडी जमवत घरटे विणते आई


दाम मोजता जगात मिळते सगळे काही

पान्हा फुटतो फक्त तिला जी असते आई


संसाराला ग्रहण लागले जरी कधी तर

अंधाराला कवेत घेऊन निजते आई


बाप-मुलाच्या भांडणात ती रात्र काढते

वात दिव्याची होऊन रोज जळते आई


२.


स्वप्नातल्या जगाला सत्यात मांडतो मी

माणूस माणसाशी जोडीत चालतो मी


दिसतात तत्त्व हतबल बुजगावण्याप्रमाणे

निष्ठेस आज दारी लाचार पाहतो मी


ते घेरतील मजला पाहून एकट्याला

आव्हान संकटांचे हासून पेलतो मी


गोष्टी पराक्रमाच्या गीतात ऐकतो मी

पाहून षंढ व्यक्ती आतून पेटतो मी


शब्दांस जागतो अन् शब्दiस पाळतो जो

तो धर्म माणसांचा माझ्यात शोधतो मी


विश्वास माणसाचा पानीपतात गेला

इतिहास माणसांच्या डोळ्यांत वाचतो मी


काहूर माजले की मी शांत आत बसतो

लोकांस गौतमाचा मग अंश भासतो मी


३.


लाभलेले दुःख येथे,बोलणेही शक्य नाही

जीवघेणा कोंडमारा सोसणेही शक्य नाही


सामना प्रत्येक वेळी जिंकणेही शक्य नाही

हारलेला डाव ऐसा सोडणेही शक्य नाही


जात, पैसा अन् प्रतिष्ठा, खेळ होतो या जगाचा

प्रेमिकांनी हार आता मानणेही शक्य नाही


विठ्ठला रे घेरलेला तू सदा बडव्यांत असतो

काय मग देवा तुझ्याशी भांडणेही शक्य नाही


वेदनेला रोग इथल्या माणसांचा लागला हा

ती निधर्मी आव आणुन वागणेही शक्य नाही


एकदा भेटून आठवणीं तुझ्या घेऊन जा तू

मग पुन्हा नशिबात आता भेटणेही शक्य नाही


रामही अन् कृष्णही आदर्श आहे आज माझा

कोणता आदर्श दुसरा सांगणेही शक्य नाही


1 comment: