तीन गझल : कुमारेश

 




१.


वळणावरी अचानक लागून ठेच जाते

प्रत्येक चूक अपुली शिकवून हेच जाते 


ऐश्वर्य सर्व आहे  केले उभे इथे मी 

व्याकूळ मन तरीही गावाकडेच जाते


होऊन आठवण ती पायात फार येते 

घेऊन सावलीला  माझ्यापुढेच जाते


केला कधीच नाही त्यांनी विचार अपुला

त्यांचा विचार करुनी जीवन असेच जाते


कर स्वच्छ ही समाधी वाहून घे फुलांना

माझी हयात आता सारी इथेच जाते


वाद्ये तुझ्या स्मृतींची ही वाजतात अंती 

आयुष्य माणसाचे बाकी सुनेच जाते


या जीवनात अपुल्या  कर्तव्य थोर असते 

प्रारब्ध माणसाचे मरणासवेच जाते


२.


एवढा मी जीर्ण  वाटू लागलो

आतल्याआतून फाटू लागलो 


दोष आता मी कुणाला द्यायचा

मीच माझे पंख छाटू लागलो 


चव तुझी  नाही कधीही घेतली

स्पर्श केल्यानेच  बाटू लागलो 


दे मला आधार बोटांचा तुझ्या 

लेकरू होऊन आटू लागलो 


तोंड दिसते लाल जखमी का तुझे 

तो म्हणाला  रक्त  चाटू लागलो 


भव्यता माझ्या वयाची वाढली 

मी घराच्या आत दाटू लागलो 


सांगताही येत नाही वंचना

आर्त हाकेने  झपाटू लागलो 

 

३.


फुगा फुगवला विश्वाचा मग प्राण ओतला त्याने 

काळोखाचा शुन्य फोडुनी  दिवा लावला त्याने॥


तुझी  वेदना अश्रू ढाळुन हलकी व्हावी म्हणुनी 

डोळ्यामध्ये झरा ठेवला व्यक्त व्हायला त्याने 


पंचशिलाचे पालन व्हावे वचन घेतले आधी 

उपदेशाने मग ज्ञानाचा नेत्र उघडला त्याने 


माती,पाणी,उजेड,वारा, गगन मिसळले सगळे 

लेप बनवुनी पाच थरांचा ढीग रचियला त्याने 


बोध ऐकण्या रात्र काढली जागत त्याच्या चरणी 

देव भेटतो मानवजन्मी दिला दाखला त्याने 

..........................................

कुमारेश

(नारायण किसनराव सुरंदसे )

धामणगाव रेल्वे 

जि . अमरावती

No comments:

Post a Comment