१.
मला न कळले आयुष्याचे हिशोब सारे सारे
असे बिनसले आयुष्याचे हिशोब सारे सारे
तिने घेतले पंखाखाली मला न घेता आले
इथेच चुकले आयुष्याचे हिशोब सारे सारे
कळूनही मग जेव्हा काही कळले नाही तेव्हा
किती समजले आयुष्याचे हिशोब सारे सारे
मी, माझा अन् माझ्यासाठी इतके सोपे होते
कसे बिघडले आयुष्याचे हिशोब सारे सारे
अंतिम घटिका त्यानंतरचे राम नाम जपलेले
अरे संपले आयुष्याचे हिशोब सारे सारे
२.
तिथे थांबून गेलेल्या युगांचे काय झाले मग
मनावर खोल रुजलेल्या व्रणांचे काय झाले मग
उगा ती पानगळ नव्हती, जरासे कालचे आठव
तुझ्या वाटेत आलेल्या फुलांचे काय झाले मग
जरी कोसळ म्हणाले मी तरी जे साचले होते
तुझ्या डोळ्यात दिसलेल्या ढगांचे काय झाले मग
जिथे भेटायचे ठरले तिथे अंधार होता, पण
तुला वेढून असलेल्या दिव्यांचे काय झाले मग
जराशी रात्र कललेली जरासे चांदणे होते
अशा नाजूक वेळी काहुरांचे काय झाले मग
पुन्हा परतून येणेही तुला जर शक्य नव्हते तर
वृथा बंदिस्त झालेल्या दिशांचे काय झाले मग
३.
मरणाचा होणार सोहळा फार फार तर
असेल माझा जन्म वेगळा फार फार तर
रंग लागला या देहाचा त्या देहाला
राधेलाही रंग सावळा फार फार तर
एकच असते गोष्ट नव्याने सांगत सुटतो
दारापुढचा एक भोपळा फार फार तर
उलटी गंगा वाहत आहे,हेच सांगण्या
एक पराचा हवा कावळा फार फार तर
हेही माझे,तेही माझे, सारे माझे
जन्मभराचा सोस पांगळा फार फार तर
नातू होतो त्यानंतर मग पणतूसाठी
पुन्हा गुंततो पाय मोकळा फार फार तर
जन्म देऊन मृत्यूसाठी जो अडकवतो
तोच लावतो इथे सापळा फार फार तर
फारच सुंदर !!!
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteगझल सम्राज्ञी चंदनाच्या तिन्ही गझल आवडल्या.. एक से बढकर एक ❤️❤️
ReplyDeleteखूप धन्यवाद 🌹🌹 किरण ताई
Deleteवाह ...क्या बात ...🌹
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete