१.
थेंबांची लय अंगामध्ये भिनव म्हणाला !
कोंभ होउनी मनातून मग उगव म्हणाला !
दूर किती आलास सोडुनी बालपणाला
मूल होउनी स्वतःस खुदकन हसव म्हणाला !
कविता सुचते म्हणून आली जबाबदारी
दुःख भोगुनी कवितेलाही प्रसव म्हणाला !
कोरडवाहू शेत मनाचे तहानलेले
अश्रू आला अन् दुःखाला पिकव म्हणाला !
आभाळाच्या भाळावरती लिहायचे तर
आभाळाला हृदयामध्ये रुजव म्हणाला !
क्षितिजावर आलाच मनाच्या ढग येताना
चल एखादे पाउसगाणे सुनव म्हणाला !
२.
बघणाऱ्याला सुंदर दिसतो आहे
चढणाऱ्याला पर्वत कळतो आहे
अंधाराच्या मनात काही नाही
मनात मी का भीती जपतो आहे
धावत आहे काळ किती वेगाने
काळासोबत मी फरफटतो आहे
स्वप्नामध्ये जगतो आहे की मी
जितेपणाचे स्वप्नच बघतो आहे
एका ओळीमधेच सरली कविता
कवी उगीचच शब्द जुळवतो आहे
३.
एवढे सांगा कसे पुरवायचे पाणी
आजही येणार नाही प्यायचे पाणी
प्यायला मिळणार नाही गप्प बसलो तर
एकमेकांशी किती भांडायचे पाणी
मैलभर पळवायला लावायचे कोणा
एकमेकांचे कुणी पळवायचे पाणी
एक होता काळ माझ्या वावरामध्ये
पेरणी होता किती बरसायचे पाणी
दूर मी शहरात होतो शिक्षणासाठी
डोह होउन वाट माझी पाह्यचे पाणी
ऐक ना घेऊ नको तू आणखी पोरी
न्हायच्या नादात हे संपायचे पाणी
.............................................
हेमंत राजाराम, डोंबिवली
8169719389
No comments:
Post a Comment