तीन गझला : बाळ पाटील

 



१.

या धरतीचे आपण कोणी मालकजादे नाही
अंती कळते करदोड्याचे सूत स्वत:चे नाही

या देहाशी बिलगुन आली ती ती नाती खोटी
राखेचे मातीशी जुळते बाकी नाते नाही

पाय पसर तू अंथरुणावर आहे जितकी जागा
केव्हा आलो चौखांद्यावर समजायाचे नाही

क्षणभंगुर हे जीवन जैसे दहिवर पानावरती
झरले केव्हा,विरले कोठे कोणा ठावे नाही

कळले थोडे जाता जाता शेवटच्या श्वासांना
माझे म्हणुनी मिरवत होतो , ते तन माझे नाही

२.

उरलो मागे तुटका फुटका जाता जाता
आयुष्याचा झाला मटका जाता जाता

वाटत होते हासत आली,जमले आता
तीही गेली लावुन चटका जाता जाता

हृदयावरती त्याची मोठी हुकुमत होती
त्यालाही बघ आला झटका जाता जाता

फार तुरा वर मिरवत होता डोईवरती
तिरडीवरती ठेवा पटका जाता जाता

या जगण्याने कोंडुन कोंडुन वेठी धरले
अन् श्वासाने केली सुटका जाता जाता

३.

ती डोळ्यांनी बोलत आहे बहुधा
तो मानेने ऐकत आहे बहुधा

हे जग त्याला उलटे दिसते आहे
तो डोक्याने चालत आहे बहुधा

रोज तसे तो काहीबाही लिहितो
हल्ली तोही वाचत आहे बहुधा

फारच चर्चा त्याच्या डोक्याची बघ
तोही टोप्या घालत आहे बहुधा

लग्नाआधी फार दरारा होता
आता तो शरणागत आहे बहुधा

.................................
बाळ पाटील
'मुक्ताई ',२८ /२७५ ,
डी.आय.सी.बायपास रोड, उस्मानाबाद
भ्रमणध्वनी : ८३०८५०३३९९

No comments:

Post a Comment